पुणे—पुण्यातील कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला करून बनावट एटीएम कार्डद्वारे 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी सुमेर शेख (वय 28) या दुबईस्थित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुमेरच्या अटकेमुळे कॉसमॉस सायबर हल्ल्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा केला जात आहे.
सायबर गुन्हेगारांनी 11 आणि 13 ऑगस्ट 2018 रोजी पुण्यातील कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर सायबर हल्ला केला होता. बनावट एटीम कार्डद्वारे 94 कोटी 42 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे. कॉसमॉस बॅंक सायबर हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी सुमेर शेख हा एक आहे. इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याबाबत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे 28 देशांच्या पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. यूएई पोलिसांना तपास करताना शेख जाळ्यात सापडला.
सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली होती. या माहितीचा वापर करुन बनावट एटीएम कार्ड बनवले. ही कार्ड वापरात आणण्यासाठी आधी बॅंकेचा एटीएम स्वीच सर्व्हर हॅक करण्यात आला होता.
सायबर हल्ला केल्यानंतर तो पैसा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी देश-परदेशात टोळ्या बनवल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून पैसे काढून घेतले. तर हॉंगकॉंगच्या हेनसेंग बॅंकेमध्ये आरोपींनी 11 ते 12 कोटी रुपये पाठवले होते. त्यापैकी सहा कोटी रुपये परत मिळवण्यात पुणे पोलिसांना यश आले.