ऑक्सिजन सिलींडर व वैद्यकीय उपकरणांनी २५ ऑटोरिक्षा ॲम्ब्युलन्सचा ताफा सज्ज: मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे अर्थसहाय्य

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -दुबईस्थित अल अदील समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी रिक्षा ॲम्ब्युलन्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित स्वदेश सेवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम या दोन स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नुकतेच पुण्यात  झाले. या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन सिलींडर व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज २५ ऑटोरिक्षा ॲम्ब्युलन्सचा ताफा तत्पर असून त्यांची संख्या लवकरच १०० पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट्य आहे. प्रारंभी या रिक्षा ॲम्ब्युलन्स पुणे शहर व लगतचे मुळशी मावळ आदी तालुके, पिंपरी-चिंचवड, भोर, सांगली व अहमदनगर या शहरांत रुग्णांना सेवा देतील.

यासंदर्भात माहिती देताना या उपक्रमाच्या समन्वयक तथा स्वदेश सेवा फाऊंडेशन च्या संस्थापक धनश्री पाटील म्हणाल्या, कोविड विषाणूच्या नुकत्याच ओढवलेल्या दुसऱ्या साथीत बाधित रुग्णांसाठी प्राणवायू (ऑक्सिजन) किती महत्त्वाचा आहे, हे आपल्या सर्वांनाच उमगले आहे बऱ्याचदा अशीही अडचण येते, की रुग्णाचे घर गल्लीबोळात असल्यामुळे रुग्णवाहिका तेथपर्यंत पोचणे अशक्य होते. यावर ऑटोरिक्षाचा वापर ॲम्ब्युलन्स म्हणून करण्याची कल्पना सुचली. ऑटोरिक्षा ही  अरुंद गल्लीबोळांतही सहजतेने नेता येते. अशी रिक्षा ऑक्सिजन सिलींडर व आवश्यक त्या वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असेल तर त्या रुग्णाला घरापासून रुग्णालयात दाखल करेपर्यंत ऑक्सिजनचा अखंडित पुरवठा करणे शक्य होईल आणि वेळेवर उपचार होऊन त्याचे प्राण वाचू शकतात. या उपक्रमाला समाजहितैषी डॉ. धनंजय दातार यांनी संपूर्ण अर्थसाह्य दिले असून बघतोय रिक्षावाला फोरम ने २५ रिक्षांचा ताफा व समर्पित चालकांचा संघ दिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, आमच्या या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांचा संघही सहभागी आहे. हे डॉक्टर रुग्णांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा ॲम्ब्युलन्स चालकांच्या अखंड संपर्कात राहतील. रुग्णाच्या नातलगांनी +९१ ९६५७२ ८९४११ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रुग्णाला घरापासून जवळच्या रुग्णालयात दाखल करेपर्यंत पूर्ण वेळ हे डॉक्टर रिक्षाचालकांना रुग्णाची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करत राहतील. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन कसा द्यायचा, ऑक्सिजन फ्लो मीटर कसा हाताळायचा, पल्स ऑक्सिमीटरच्या साह्याने ऑक्सिजनची पातळी कशी मोजायची, रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यायची यांचे पूर्ण प्रशिक्षण या चालकांना देण्यात आले आहे.

अधिक तपशील देताना बघतोय रिक्षावाला फोरम चे संस्थापक डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, की या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला खूप अभिमान व आनंद वाटत आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत व समाजसेवेत योगदान देण्यात आम्ही मागे हटणार नाही. आमचे चालक करोना नियमावलीचे संपूर्ण पालन करुन रुग्णांची वाहतूक करतील. प्रत्येक रिक्षा ॲम्ब्युलन्समध्ये केवळ चालक व रुग्णच असतील. चालक मास्क परिधान करेल व रिक्षा ॲम्ब्युलन्स सॅनिटायझरने निर्जंतुक असेल. रिक्षा ॲम्ब्युलन्सचे भाडे न परवडणाऱ्या गरीबांसाठी ही सेवा मोफत असेल व ज्यांना काही देणे शक्य आहे अशा सर्वसामान्यांना ती अल्प दरांत उपलब्ध असेल.

या उपक्रमाला अर्थसाह्य पुरवणारे डॉ. धनंजय दातार म्हणाले, की अल अदील  समूह उत्तम समाजोपयोगी उपक्रमांच्या पाठीशी नेहमीच उभा राहतो. रिक्षा ॲम्ब्युलन्स सारख्या उपक्रमात वाटा उचलताना आम्हाला कृतकृत्य वाटत आहे. करोनाची दुसरी साथ ओसरत असली तरी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे झालेले हाल विसरता येणार नाहीत. समाज संपूर्ण साथमुक्त होईपर्यंत आपल्याला काळजी घेणे भाग आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षा ॲम्ब्युलन्स रुग्णांसाठी नक्कीच प्राणदाता ठरतील, ही माझी खात्री आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *