२५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होणार

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे–महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे २५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे दि. २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील करणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठाचे विश्वस्त व निर्देशक साहू अखिलेश जैन (दिल्ली) आणि दैनिक पंजाब केसरीचे कार्यकारी अध्यक्ष, भारतीय ज्ञानपीठाचे विश्वस्त व इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे प्रमुख स्वदेशभूषण जैन (दिल्ली) यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. संमेलनाध्यक्षपद डॉ. रावसाहेब पाटील भूषविणार आहेत. त्रिदिवसीय संमेलनात विविध सत्रांमध्ये वक्ते म्हणून महात्मा गांधी यांचे पणतू लेखक तुषार गांधी, ज्येष्ठ विचारवंत उल्हास दादा पवार, प्राचीन मराठीचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे, अरुण खोरे, श्रीमंत कोकाटे, संजय सोनावणे, मिलिंद जोशी आदिंची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत अशी माहिती स्वागताध्यक्ष मिलिंद रत्नकांत फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या रौप्य महोत्सवी संमेलनानिमित्त तीन दिवसात पंचवीस विविध उपक्रमांतर्गत ज्ञानज्योती प्रवर्तन दि. १३ जुलै रोजी लक्ष्मीसेन जैन मठ, कोल्हापूर येथून झाले असून, दि. २९ जुलै रोजी सकाळी ८ वा. ग्रंथ दिंडीचा प्रारंभ सोलापूरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून होणार असून सकाळी १०.३० वा. ध्वजवंदन, वैशाली साहित्य नगरीं, सम्राटखारवेल प्रवेशद्वार, गंगसेनापती चामुंडराय सभागृह, आचार्य विद्यानंद इतिहास व पुरातत्व प्रदर्शन, आद्य जैन पत्रकार हिराचंद नेमचंद प्रवेशद्वार, दिवाणी बहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे ग्रंथप्रदर्शन, प्रभातकार वा. रा. कोठारी मंच अशी विविध उद्घाटने होतील. अशीही माहिती स्वागताध्यक्ष यांनी दिली.

दुपारी ३.३० वा. उद्घाटन समारोह संपन्न होणार असून सायंकाळी जैन महिला विकास मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. ३० व ३१ जुलै रोजी सकाळी ९ पासून युवक-साहित्य अभिरुची : सद्य स्थिती वभवितव्य, मराठीच्या जयंतीचे अभिलेख, जैन महिलांचे साहित्यिक योगदान, प्राचीन महाराष्ट्राला जेव्हा जाग येते, महात्मा गांधी जीवन व विचार – विश्व शांतीचा संदेश आदी विषयांवर चर्चा सत्रे, परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय दि. ३० जुलै रोजी रात्रौ ९ वा. कवी संमेलन व ३१ जुलै रोजी सकाळी ११ वा. ‘प्रसार माध्यमे – बदलते प्रवाह व संधी’ या विषयावर महत्वाची परिचर्चा होत असून या चर्चेत ज्येष्ठ संपादक विजय बावीस्कर, पराग करंदीकर, मुकुंद संगोराम सहभागी होत आहेत. त्यानंतर दु. १ वा. उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार व समारोप समारंभ होईल.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातील प्रमुख जैन संघटना व संस्थांचे सहकार्य घेण्यात येत असून प्राचार्य श्रीधर हेरवाडे, जोहड कार सुरेखा शहा, इतिहास अभ्यासक प्राचार्य गजकुमार शहा, निलम माणगावे, डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य नरेश बदनोरे आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. संमेलनाच्या व्यापक आयोजनासाठी महाराष्ट्र स्तरावर स्वागत समितीचे गठन करण्यात आले असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सर्व मराठी जैन साहित्यरसिकांनी या सम्मेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस सम्मेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील, यजमान नंदकिशोर मोतीलाल शहा, स्वागत समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र शहा, सुदिन खोत, स्वागत समिती सदस्य अचल जैन, सुजाता शहा, अजित पाटील, वीरकुमार शहा आदि उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *