पिंपरी(संध्या नांगरे) : लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर खुला केलेल्या ‘पीएमपी’च्या (pmp) बसेससाठीच्या निगडी ते दापोडी बीआरटी (BRT) मार्गावरील थांब्यांची पुरती दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. तरीही या मार्गाकडे प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहेच पण हे थांबे उभारण्यासाठी झालेला भरमसाठ खर्च वाया जाऊ लागला आहे.
निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर भक्ती शक्ती, टिळक चौक, बजाज ऑटो, आकुर्डी, काळभोर नगर, जयश्री टॅआकीज, चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट, मोरवाडी, पिंपरी, खराळवाडी, एच. ए. कंपनी, वल्लभनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, एटलास कॅआपको, फुगेवाडी जकात नाका, फुगेवाडी, दापोडी हे थांबे ( BRT corridor) आहेत.
या बीआरटी थांब्यांवर सुरक्षा कर्मचारी व त्यांच्यासाठी केबीन, थांब्यांना सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजे, बसेसचे मार्ग आणि वेळा दाखवणारी इलेक्ट्रॉनिक स्क्रीन, बसावयासाठी आसने अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र आता या थांब्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

बीआरटी थांब्यांवर लक्ष देण्यासाठी, प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक थांब्यावर नेमलेले सुरक्षा कर्मचारी आता काढले आहेत. त्यामुळे थांब्यांची सुरक्षा वारयावर पडली आहे. थांब्यांवरील स्वयंचलित दरवाजे देखभालीअभावी बंद पडून आता मोडकळीस आले आहेत, दरवाजांच्या काचा फुटल्या आहेत आणि काही थांब्यांना दरवाजेच राहिलेले नाहीत; ते चोरीलाही गेले आहेत. सुरक्षा रक्षकांच्या केबीन मोडतोड होऊन पडल्या आहेत. तिथे भंगार सामान रचले आहे. दिवे खराब झाले आहेत.

स्वच्छता केली जात नसल्यामुळे सर्व थांब्यांवर धुळीचे साम्राज्य परसले आहे, अवतीभवती कचरा साचला आहे, लोकांनी थुंकून घाण केली आहे. एवढेच नव्हे तर काही थांबे म्हणजे मद्यपीचे रोजचे अड्डे बनले आहेत, तेथे विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांना असुरक्षित व गैरसोयीचे वाटत आहे.

सर्व थांब्यावरील बसेसच्या वेळा व मार्ग दाखवणारी यंत्रणा ( electronic screen) बंद करण्यात आली आहे. पर्याय म्हणून तेथे बसेसच्या मार्गाची नावे कागदावर टाईप करुन चिकटवले कागदही आता फाटून गेले आहेत. त्यामुळे कुठली बस कुठे जाते याची नेमकी व अचूक माहिती प्रवाशांना मिळत नाहीये. थांब्यांवरील दोन दरवाजापैकी कोणत्या दरवाजात थांबायचे हा गोंधळ होत असून बस आली की तारांबळ उडते. अपंग प्रवासी तर ताटकळत थांबलेले असतात. प्रशासनाने लक्ष देऊन हे चित्र बदलावे याचीच आता प्रतिक्षा आहे.
अनंत वाघमारे (बीआरटी व्यवस्थापक, पीएमपीएमएल) :
बीआरटी थांब्यांवर सुरक्षा कर्मचारी नेमले होते पण ते खर्चिक असल्याने आता काढले आहेत. पुन्हा सुरक्षा कर्मचारी नेमण्याचे सध्या नियोजन नाही. तसेच घाण झालेले थांबे धुवून घेतले जाणार आहेत आणि डेपोमधील कर्मचारी थांब्यांवरील स्वच्छता करतात.