NDA Passing Out Parade: एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा; १८ महिला कॅडेट्सचे ऐतिहासिक ‘अंतिम पाऊल’

NDA Passing Out Parade: एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा
NDA Passing Out Parade: एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा

पुणे(प्रतिनिधी)–पुणे येथील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा (पासिंग आऊट परेड) अत्यंत उत्साहात आणि लष्करी शिस्तीत शनिवारी पार पडला. उत्तीर्ण होणाऱ्या छात्र सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आकाशात झेपावणाऱ्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती आणि  शिस्त, निष्ठा आणि अजोड देशप्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या या परेडमध्ये छात्र सैनिकांनी आपल्या संचलनातून उपस्थितांची मने जिंकली. हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून आलेल्या पालकांचे चेहरे आपल्या पाल्यांना लष्करी गणवेशात पाहून अभिमानाने फुलले होते. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १८ महिला छात्र सैनिकांसह एकूण ३५३ छात्र सैनिकांनी ‘ओल्ड लँग साईन’च्या हृदयस्पर्शी सुरावटीत ‘अंतिम पाऊल’ ओलांडून आपल्या लष्करी कारकिर्दीच्या दिशेने यशस्वी झेप घेतली.

या ऐतिहासिक सोहळ्याला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. ४२ वर्षांपूर्वी याच मैदानावरून उत्तीर्ण होऊन आपल्या लष्करी प्रवासाला सुरुवात करणाऱ्या जनरल द्विवेदी यांनी हा क्षण आपल्यासाठी भावूक आणि अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. त्यांनी नवोदित छात्रसैनिकांना मार्गदर्शन करताना ‘सेवा परमो धर्म’ हा मंत्र देत, कठीण परिस्थितीतही देशाचे रक्षण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  पुणे महापालिका की राजकीय नेत्यांचे बाहुले? लोहगावमधील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करताना दाखवलेली तत्परता वडगावच्या बाबतीत का गायब झाली?

या सोहळ्यात इंडिया स्क्वॉड्रनच्या बटालियन कॅडेट कॅप्टन रोहित काजला याला राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठित सुवर्ण पदकाने  सन्मानित करण्यात आले. माईक स्क्वॉड्रनच्या ॲकेडमी कॅडेट ॲडज्युटंट शौर्या याला रौप्य पदक, तर ब्राव्हो स्क्वॉड्रनच्या बटालियन कॅडेट कॅप्टन सान शर्मा याला कांस्य पदक प्रदान करण्यात आले. या सत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा मानाचा ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पटकावण्याचा मान ‘चार्ली स्क्वॉड्रन’ने मिळवला. संचलनाचे नेतृत्व ॲकेडमी कॅप्टन मयांक ची यांनी केले, तर गोल्फ स्क्वॉड्रनच्या छात्र सैनिकांनी चीफ स्टार बॅनरसह संचलनात सहभाग नोंदवला.

आपल्या भाषणात जनरल द्विवेदी यांनी आधुनिक युद्धातील बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला.  “आजच्या सुरक्षा वातावरणात स्पर्धा आणि संघर्ष यातील सीमा पुसट होत चालल्या आहेत,” असे नमूद करत त्यांनी छात्र सैनिकांनी  वृत्ती, अनुकूलनक्षमता आणि क्षमता या तीन गुणांचा अंगीकार करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सध्या स्पर्धा आणि संघर्षातील सीमा पुसट झाल्या असून धोके नेहमीच गणवेशात किंवा जाहीरपणे समोर येत नाहीत. ‘ग्रे झोन’ पासून ते हाय-व्हेलॉसिटी हायब्रीड युद्धापर्यंतची आव्हाने आज देशासमोर आहेत. अशा परिस्थितीत केवळ कृती करून चालणार नाही, तर ती विचारपूर्वक करणे काळाची गरज आहे. ऑपरेशन सिंदूरने हेच दाखवून दिले की, जेव्हा राष्ट्रीय इच्छाशक्ती अचूकता आणि निर्धाराने व्यक्त होते, तेव्हा भारत चिथावणीला कशा प्रकारे उत्तर देतो. हेच मानक आता नव्या पिढीला जपायचे आहे.

अधिक वाचा  भाजपचा 'काँग्रेसमुक्त भारत' की काँग्रेसयुक्त भाजप? : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

एनडीएची पायाभरणी ही केवळ संकल्पना म्हणून नाही, तर तिन्ही दलांमधील जवानांनी एकत्र राहून काम करण्याची वृत्ती जोपासावी यावर आधारित आहे. येणाऱ्या काळात संरक्षण सेवांमध्ये एकात्मिक संरचना अधिक खोलवर रुजणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणतेही सैन्यदल निवडले तरी, महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांना खांद्याला खांदा लावूनच देशाची सेवा करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले

रणांगण हे लिंगभेदाला थारा देत नाही

विशेष म्हणजे, या तुकडीत एनडीएच्या सर्वसमावेशकता आणि राष्ट्र उभारणीच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून १८ महिला छात्र सैनिकांनी पुरुष छात्र सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून प्रशिक्षण पूर्ण केले.  जनरल द्विवेदी यांनी महिला छात्र सैनिकांच्या कर्तृत्वाचे यांनी विशेष कौतुक केले.

महिला छात्र सैनिकांनी प्रशिक्षणाचे प्रत्येक निकष यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्या प्रत्येक फॉर्मेशनमध्ये पुरुष छात्र सैनिकांच्या बरोबरीने उभ्या होत्या असे सांगून ते म्हणाले, संचलन मैदानावर महिला छात्र सैनिकांची  शिस्त आणि कवायत इतकी प्रभावी होती की त्या इतर कोणत्याही छात्र सैनिकांपेक्षा  वेगळ्या दिसत नव्हत्या,हेच त्यांच्या प्रशिक्षणाचे यश आहे.

अधिक वाचा  संघ शताब्दी मंथन: राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सर्वांनी योगदान द्यावे; नरेंद्र ठाकूर यांचे पुण्यात आवाहन

रणांगणावर लागणारी जिद्द, चिकाटी आणि संकल्प  यांना कोणतेही लिंग नसते. युद्ध हे नेहमीच ‘जेंडर न्यूट्रल’ (लिंग-तटस्थ) असते आणि या महिला कॅडेट्स भविष्यात आपल्या सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१२ मित्र देशांतील २४ परदेशी छात्र सैनिकांनी केले प्रशिक्षण पूर्ण

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये १२ मित्र देशांतील २४ परदेशी कॅडेट्सनीही आपले प्रशिक्षण पूर्ण केले. संचलनादरम्यान आकाशात हेलिकॉप्टर्स आणि सुखोई -३० एमकेआय विमानांनी चित्तथरारक प्रदर्शन (‘फ्लाईपास्ट’) सादर केले. मिग-१७ हेलिकॉप्टर्सनी ‘साइन फॉर्मेशन’मध्ये, तर सुखोई विमानांनी ‘त्रिशूल’ आणि ‘ऱ्हिनो’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करत उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. संचलनाच्या शेवटी, जेव्हा लष्करी बँडने ‘ओल्ड लँग साईन’ची धून वाजवली, तेव्हा १५० व्या तुकडीच्या छात्र सैनिकांनी  अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘क्वार्टर डेक’ ओलांडला. हा क्षण या तरुण अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात आणि पालकांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला. प्रबोधिनीच्या तीन वर्षांच्या कठीण प्रशिक्षणानंतर हे कॅडेट्स आता विविध लष्करी अकादमींमध्ये आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना होतील.20913

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love