पुणे(प्रतिनिधि)—लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर हंगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी पार पडण्यासाठी काही तासांचा अवधि शिल्लक आहे. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाकोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्रामध्ये सहा ते सात मंत्रीपदे दिली जाणार असल्याचे बोलले जात आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागणार आहे. त्याबाबत मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून अधिकृत संपर्क साधण्यात आला आहे. पैलवान असलेल्या आणि महाराष्ट्र केसरीचे भव्य आयोजन केलेल्या मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या मोहोळ यांनी विविध विषय समित्या आणि स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीएलचे साडेतीन वर्षे संचालक आणि अडीच वर्षे महापौर पद भूषविले आहे. मुरलीधर मोहोळ हे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्षही होते.
या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवत शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आपली एक मिनी खासदार अशी प्रतिमा निर्माण केली आहे. काही उपक्रम तर अनेक वर्षांपासून ते राबवत आहेत. त्यामध्ये इयत्ता १० वी, १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान हा त्यांचा उपक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे तर भव्यदिव्य कोथरूड सांस्कृतिक महोत्सवही सलग १२ वर्षे सुरू आहे.
मोहोळ यांच्या कामाची आणि काम करण्याच्या पद्धतीची खरी ओळख झाली ती कोरोनाच्या काळात. या काळात ते महापौर होते. त्यांनाही कोरोनाने गाठले होते. मात्र, त्यातून बाहेर येत त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून अखंडपणे जनसंवाद करत पुणेकरांना धीर दिला. त्यामुळे ‘कोरोनाला हरवणारा महापौर’ ते ‘कोरोनाग्रस्तांना आधार देणारा महापौर’ अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झाली.
पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी त्यांनी १९१७-१८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना अर्थसंकल्पामध्ये केलेली आर्थिक तरतूद, त्यासाठी तातडीने ट्रस्ट स्थापन करून राज्य सरकारची मान्यता आणि केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याला आलेले यश यामुळे पुण्यनगरीच्या मुकूटावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कर्वे रस्त्यावरील पहिला दुमजली उड्डाणपुल असेल, पुणे शहराची सार्वजनिक वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस पुणे शहरात आणल्या आणि अजूनही येत आहेत. त्यामुळे सध्या रस्त्यावर पीएमपीएलमध्ये एकही डिझेलवर चालणारी बस नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करणारे सर्वात मोठे सेंटर म्हणून पुणे शहर झाले आहे. या सर्वाचे श्रेय हे मोहोळ यांनाच जाते. याशिवाय नदी सुधार प्रकल्प, नदी पुनर्जीवन प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक , २४/७ पाण्याची योजना यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि पुणे शहराच्या भविष्याचा विचार करून अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले.
कोरोनानंतर पुणे शहरात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आपला वाढदिवस साजरा न करता ‘रक्तदान महासंकल्पा’सारखे उपक्रम ते घेत आहेत त्या माध्यमातून १८ हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले. त्याबरोबरच आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. पुणे महानगर पालिका आवारात स्वखर्चाने शिवाजी महाराजांचा पुतळा मोहोळ यांनी बसवला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या सर्व कार्याबरोबरच स्वत: पैलवानकी केलेल्या मोहोळ यांनी कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा भरवल्या तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. अटल संस्कृती गौरव पुरस्कार आणि अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानिमिताने कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन त्यांनी केले होते.
मोहोळ यांची राजकीय वाटचाल
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक…
– गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता…
– बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात…
– युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी…
– संघटनेत ३० वर्षे कार्यरत…
– सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान…
– २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक
– २०१७ : साली स्थायी समिती धुरा…
– २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी…
– कोरोना काळात विविध पातळ्यांवर भरीव काम
– २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी…
– २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा
– २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी
– ४ जून, २०२४ : खासदार, पुणे