पुणे : वेळेचे पालन, परिश्रम करण्याची तयारी आणि सतत हसतमुख राहणे प्रत्येकाने गरजेचे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर ज्ञान, रक्षा हे मंत्र आणि हास्य व ध्यान योग आपण अंगिकारायला हवा. आई-वडिलांना अभिमान वाटेल, असे काम करीत आपण शिस्तीचे पालन करायला हवे. पाकिस्तानपेक्षाही मोबाईल, टिव्ही हे आपले मोठे शत्रू असून त्यापासून आपण दूर रहायला हवे, असे मत कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाटयगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन येथे आयोजित कुलरंग महोत्सवात बाल कार्य सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सेक्रेटरी अण्णा थोरात, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाचे नरेंद्र धायगुडे, कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम, यश गुजराथी, सानिका काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुण्यात ३५ वर्षे मुलांच्या शारिरीक, मानसिक विकासासाठी काम करणा-या बालरंजन केंद्र, भारती निवास सोसायटी, कर्वे रस्ता या संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप होते. बालरंजन केंद्राच्या माधुरी सहस्त्रबुद्धे व सहका-यांनी हा सन्मान स्विकारला.
अण्णा थोरात म्हणाले, संगणकाच्या युगात मुलांकडून शिक्षणासोबतच खेळ होणे गरजेचे आहे. अनेक पालक शिक्षणासाठी मुलांवर खूप दबाव आणतात. काही मुले ही शिक्षणापेक्षा खेळामध्ये प्रविण असतात. त्यांना प्रोत्साहन देणे देखील गरजेचे आहे. खेळामुळे बुद्धी तल्लख होऊन आपली सर्वांगिण प्रगती होत असते.
माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, द्या खेळाला एक तास, विधायक उपक्रमांतून बालविकास हे ब्रीद घेऊन आम्ही बाल रंजन केद्राच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे कार्यरत आहोत. व्यायाम, खेळ, साहित्य, कला, संस्कृती यातून मुलांचे शिलसंवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मैदानावर ख-या अर्थाने मुले घडत असतात. मुलांसाठी आनंदक्षणांची निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. मुलांना मानसिक व शारिरीकदृष्टया खंबीर करण्याकरिता आपण पुढे यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. धनश्री देवधर, किर्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र धायगुडे यांनी आभार मानले.