धोकादायक नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करावी :छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी


पुणे-नायलॉन मांजाचा वापर करण्यास बंदी असतानाही बाजारात सहज उपलब्ध होत असलेल्या नायलॉन मांजामुळे शाळकरी मुले, दुचाकीस्वार, तसेच पक्षी, जनावरांचा हकनाक बळी जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक चायनीज मांजा विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करून अशा दुकानदारांना तडीपार करावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे. 

रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की जानेवारीच्या सुरुवातीपासूनच पतंग आणि मांजाला मोठी मागणी असते. नायलॉन मांजा हा घातक असल्याचे सांगूनही सर्रास वापर होत असल्याचे उघड होत आहे. गेल्या काही वर्षात तर यामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. या घातक मांजामुळे पक्षी, जनावरे व नागरिक नुसतेच जखमी होत नसून मृत्यमुखी पडत आहेत. डोळे वा अन्य अवयव निकामी होऊन कायमचे अपंगत्व येत आहे. नायलॉन मांजा रोहित्र, खांबावर पडून तारांमध्ये घर्षण होत आग लागल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

अधिक वाचा  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हे कडक निर्बंध लागू :नियम न पाळणाऱयांवर होणार कठोर कारवाई

यामुळे जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाईची मोहीम राबवावी. प्रत्येकाने पतंग उडविण्याचा आनंद नक्की लुटावा, पण नायलॉन मांजा न वापरता हाताने सहज तुटणारा व पर्यावरणपूरक सूती धागा वापरावा, असे आवाहनही रामभाऊ जाधव यांनी केले.

जवळपास मांजा हा चिनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे; विशेषतः शाळकरी मुले अनेकदा याचा बळी ठरत आहेत; तर हजारो पक्षी या काळात जायबंदी झाल्याचे पाहायला मिळते. शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घडलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चिनी मांजा विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love