ध्वज ‘विजया’चा उंच धरा रे! : कारगिल विजय दिवस विशेष

राष्ट्रीय लेख
Spread the love

पाकिस्तानच्या गुणसूत्रात (डीएनए) मुरलेल्या विश्वासघाताकडे दुर्लक्ष करीत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला. वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी ऐतिहासिक लाहोर करारावर स्वाक्षरी केली. उभय देशांत शांततेचे नवे पर्व सुरु होईल अशी ‘अमन कि आशा’ या दौऱ्यामागे होती. मात्र, उभय पंतप्रधान शांतता करार करीत असताना पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ भारत-पाकिस्तानमधील ताबारेषा पेटवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या या कारस्थानाचे पर्यवसान पुढे कारगिल संघर्षात झाले. भारतमातेच्या वीर जवानांनी या संघर्षात पाकिस्तानी लष्कराला चारीमुंड्या चित करून २६ जुलै १९९९ रोजी ‘ऑपरेशन विजय’ तडीस नेले. पाकिस्तानी मनसुबे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच सपशेल बेनकाब झाले. या सर्वंकष विजयाची बावीशी साजरी करीत असताना आणि उभय देशांतील संबंधाचे ताणेबाणे लक्षात घेता हा विजयचा ध्वज असाच उंच धरण्याची वृत्ती जपली पाहिजे.

बावीस वर्षांपूर्वी ‘ऑपरेशन विजय’मध्ये पाकिस्तानला खडे चारून कारगिल मध्ये मिळवलेल्या सर्वंकष विजयाचा बाविसावा वर्धापनदिन साजरा करण्याची तयारी भारतात सुरू असतानाच, पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरच्या निवडणूक प्रचारात पुन्हा एकदा काश्मिरात सार्वमत घेण्याचे पाकिस्तानचे जुनेच तुणतुणे पुन्हा एकदा वाजवले. भारतीय लष्कराकडून कारगिल मध्ये झालेली फजिती आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर झालेली बदनामी याचा सोयीस्करपणे विसर इम्रान खान यांना पडलेला दिसतो; अन्यथा भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरबाबत खान यांनी अशी गरळ ओकली नसती. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला. आपल्या जन्मापासूनच पाकिस्तानने भारताशी उभा दावा मांडला आहे. फाळणीची जखम भळभळत असतानाच पाकिस्तानने १९४७च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या जम्मू-काश्मीर या राज्यावर लष्करी आक्रमण केले.

जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे, असे स्वप्नरंजन पाकिस्तानी राज्यकर्ते नेहमीच करत आले आहेत. त्यांच्या या स्वप्नाला साजेशी अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आहे. जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाला आक्षेप घेत; हे विलीनीकरण बेकायदा ठरवत काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याची बतावणी आंतरराष्ट्रीय स्तरावर करत पाकिस्तानने नेहमीच जम्मू-काश्मीरची जखम ठसठसत ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.

काश्मीरच्या विषयावरून १९४७ नंतर १९६५ आणि १९७१ अशी दोन युद्धे पाकिस्तानने भारतावर लादली. या दोन्ही युद्धात पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले. १९७१ च्या युद्धाचा काश्मीरची थेट संबंध नसला, तरी छुपा हेतू तोच होता. तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधील नागरिकांवर अमानुष अत्याचार करीत पाकिस्तानने तेथील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न चालवला होता. पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर पाकिस्तानी अत्याचारांचा अतिरेक झाल्यानंतर त्याचा फटका निर्वासितांच्या रुपात भारतालाही बसणे सुरू झाले; त्यामुळे भारताने भूमिका घेत पूर्व पाकिस्तानच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला आणि तेरा दिवसाच्या युद्धानंतर पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश नावाच्या नव्या देशाच्या रुपाने जगाच्या नकाशावर प्रकटला.

बांगलादेशमुक्तीसाठी झालेल्या युद्धानंतर आणि त्यातील पराभवानंतर पारंपरिक युद्धात आपण भारताला हरवू शकत नाही, याची जाणीव पाकिस्तानातील मुलकी आणि लष्करी नेतृत्वाला झाली आणि या जाणिवेतून भारताशी परोक्ष युद्ध पुकारण्याची रणनीती पाकिस्तानने अवलंबली. भारतात अस्थिरता माजविण्यासाठी पाकिस्तानने आपल्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना कामास लावले आणि त्याच माध्यमातून नव्वदच्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा नंगानाच पाकिस्तानने सुरू केला. जनरल मुशर्रफ यांनी कारगिल मध्ये केलेले धाडस हा भारताचे हजार तुकडे (Bleed India with thousand cuts) करण्याच्या पाकिस्तानी रणनीतीचाच एक भाग होता.

पाकिस्तानने १९४७ मध्ये केलेल्या आक्रमणात भारताला जम्मू-काश्मीरचा सुमारे एक लाख २० हजार चौरस किलोमीटर इतका भाग गमवावा लागला. यात मीरपूर-मुजफ्फराबाद, तसेच गिलगीट-बाल्टिस्तान या भागांचा समावेश होता. भारताने हा भाग गमावल्यामुळे पश्चिम आशिया आणि मध्य आशियाशी असलेला भारताचा थेट संबंध संपला. भू-राजकीय आणि भू-सामरिकदृष्ट्या भारताला हा मोठा धक्का होता. कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेल्या आक्रमणामागे अशीच भू-राजकीय आणि भू-सामरिक चाल होती. श्रीनगर-लेह हा राष्ट्रीय महामार्ग आपल्या माऱ्याच्या टप्प्यात आणून सियाचीन मध्ये असलेल्या भारतीय लष्करी ठाण्यांची रसद तोडणे आणि तो भाग अंतिमतः भारतापासून तोडणे, हा पाकिस्तानचा हेतू होता. त्यासाठी या महामार्गावरील महत्वाच्या ठाण्यांवर पाकिस्तानी लष्कराने अतिक्रमण केले.

थंडीच्या मोसमात हिमवर्षाव झाल्यानंतर ताबारेषेवर असलेली ठाणे आणि चौक्या सोडून मागे येणे, हा दोन्ही लष्करांचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता होता. मात्र, १९९९ च्या मे महिन्यात पाकिस्तानने भारताचा विश्वासघात करून आपले सैन्य मागे न घेता भारताने रिकाम्या केलेल्या चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या. बर्फ वितळायला लागल्यानंतर हा प्रकार भारतीय लष्कराच्या गस्ती पथकाच्या लक्षात आला आणि कारगिल युद्धाची ठिणगी पडली.

भारताचे लष्कर, तसेच हवाई दल आणि नौदलाने तीन मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान झालेल्या या युद्धात पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून द्रास, कारगिल, मश्कोव या भागातून आणि टायगर हिल व तोलोलिंग या चौक्यावरून पाकिस्तानी अतिक्रमणाला पिटाळून लावले. तर, हवाईदलाने ‘ऑपरेशन सफेदसागर’च्या माध्यमातून अति उंचावर असलेल्या पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्या. दुसरीकडे नौदलाने ‘ऑपरेशन तलवार’च्या माध्यमातून पाकिस्तानची समुद्री नाकेबंदी केली. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी एकत्रितपणे केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानला नाक मुठीत धरून भारताकडे शस्त्रसंधीची मागणी करावी लागली. या युद्धात भारताच्या सुमारे साडेचारशे तरुण अधिकारी आणि जवानांनी हौतात्म्य पत्करले.

शांततेसाठी सतत आग्रही असणारा भारत वेळप्रसंगी आपले सार्वभौमत्व राखण्यासाठी व सीमांचे रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती धरून शत्रूचा नि:पातही करू शकतो हे भारताने या युद्धात दाखवून दिले. उरी हल्ल्यानंतर केलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’ असोत अथवा पुलवामानंतरचे हवाई हल्ले असोत, त्या माध्यमातून ‘ये नाय भारत है, घर मै घूसकर मारता है,’ हे भारताने पाकिस्तानला आणि जागतिक समुदायालाही दाखवून दिले आहे. ही वृत्ती कायम ठेवून हा विजयाचा ध्वज असाच उंच राहावा, यासाठीच हा लेखनप्रपंच.

-विनय चाटी

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *