पुणे- दररोज काही छोटेसे व्यायाम केल्याने जेष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण कमी करता येत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागातील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात गेल्या आठ वर्षांपासून वयस्क व्यक्तींसंदर्भात अभ्यास केला जात आहे. यामध्ये विविध विषयांवर सखोल अभ्यास केला जात आहे.
आरोग्यशास्त्र विभागातील स्नेहल कुलकर्णी या विद्यार्थिनीने जेष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण व उपाय याबाबतचा अभ्यास केला आहे. विभागप्रमुख डॉ. आरती नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास केला असून यासाठी अमृता कुलकर्णी तसेच विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी सहकार्य केले आहे. ‘गेट अँड पोश्चर’ या ‘रिसर्च जरनल’ मध्ये याबाबतचा पेपर प्रसिद्ध झाला आहे. ‘जेरिएटिक सोसायटी ऑफ अमेरिका’ या आंतराष्ट्रीय परिषदेत या पेपरचं वाचन केलं जाणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. आरती नगरकर म्हणाल्या, साधारण दीड ते दोन वर्षांपासून पुण्याच्या विविध भागांतील, विविध आर्थिक सामाजिक गटातील आठशे जेष्ठ नागरिकांचा विभागाकडून अभ्यास करण्यात आला आहे. यात असे दिसले की अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याचे प्रमाण (फॉल रेटिंग) अधिक आहे. दिवसेंदिवस निष्क्रियता वाढल्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या शरिरावर तसेच मनावर परिणाम होतो. त्यामुळेच त्यांच्यामध्ये अवलंबून राहण्याचे प्रमाणही वाढते. अशामध्येच अनेकदा चालण्याचा आत्मविश्वासही गमावला जातो. यातून घर व परिसरात तोल जाऊन पडण्याचे प्रमाण वाढते.
याचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी स्नेहल कुलकर्णी म्हणाली, या ज्येष्ठ नागरिकांची सेन्सर असणाऱ्या उपकरणांचा वापर करून आम्ही तपासणी केली. त्यामध्ये त्यांचा चालण्याचा वेग, उठण्याबसण्याची क्षमता याचबरोबर अन्य गोष्टींचा अभ्यास करत त्यांची पडण्याची शक्यता किती टक्के आहे याचेही प्रमाणही मोजण्यात आले.
तसेच या गोष्टींपासून बचाव करण्यासाठी अभ्यास करून या ज्येष्ठ नागरिकांना आम्ही रोज काही छोट्या गोष्टी (ऍक्टिव्हिटी) करण्यास सांगितले. घरात काही छोटे बदल करण्यासही सांगितले. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचा चालण्याचा वेग वाढला, अवलंबित्व कमी झाले तसेच पडण्याचे प्रमाणही कमी झाले, असे आमच्या पाहणीतून समोर आले.
पडण्यापासून वाचण्यासाठी काय करावे
– घरात काही ठिकाणी छोटे बदल करणे जसे की हँडल बसवणे, पायरीवर रेडिअम बसवणे.
– रोजच्या रोज छोटे व्यायाम करणे, ज्यामुळे चालण्याचा वेग आणि आत्मविश्वास वाढेल.
– चालताना पडण्याची भीती कमी करण्यासाठी मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणे