पुणे- जेवणात जशी पुरणपोळी बनविणे खूप अवघड असते तसेच विनोद करणे हे देखील अवघडच. विनोदाला अनेक पदर असतात. कमरेच्या खालचे विनोद न करता दर्जा राखत भाषेच्या आधारावर विनोद करणे हे कौशल्य आहे. ‘ट ला ट’, ‘फ ला फ’ लावून विनोद होत नाही. मला विनोदी अभिनेता म्हणून शिक्का बसत असेल तर, त्याचा मला १००% अभिमानाच आहे, अशा भावना सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांनी आज व्यक्त केल्या.
दामले यांना नुकताच प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणारे ते सर्वांत कमी वयाचे नाट्यकर्मी आहेत, याचेच औचित्य साधत आज प्रभात रस्त्यावरील सी सी अँड कंपनी या ठिकाणी प्रशांत दामले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना दामले म्हणाले, “आज मी ४० वर्षे रंगभूमीवर काम करतोय, मराठी रंगभूमीवर काम करत असल्याचा मला वेगळा आनंद आहे. माझ्या छंदाचे रुपांतर व्यवसायात झाले असल्याने कितीही काम केले तरी थकायला होत नाही.” आजवर नाटकांचे १२ हजार ७९३ प्रयोग केले आहेत. महाराष्ट्रातील १२-१३ कोटी जनतेपैकी २ ते अडीच कोटी जनता ही नाट्यरसिक असल्याने अजून खूप रसिकांपर्यंत पोहोचायचे आहे, त्यामुळे हे ही आयुष्य कमी पडेल असे वाटते, असेही ते म्हणाले.
कोविडनंतरच्या काळात नाटकाची संख्या, विषय आणि गुणवत्ता वाढली आहे का या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत दामले म्हणाले, “कोविड काळात सर्वांनाच आत्मचिंतन करायची संधी मिळाली. या काळात प्रत्येकाने आपापल्या क्षेत्राचा अभ्यास केला, विचार केला. कलाकार, दिग्दर्शक म्हणून मी आणखी वेगळे काय करू शकतो, यावर भर दिला, असे मला वाटते. आजची ही परिस्थिती हा त्याचाच परिणाम आहे. कोविड आधी वर्षाला ५०-६० नाटके रंगमंचावर यायची त्यातली ३-४ चालायची. आज वर्षाला ६०-७० नाटके रंगमंचावर येत असतील तर त्यांतील ८-९ नाटके चालतात ही चांगली बाब आहे. मराठी रंगभूमीचा विचार केल्यास सर्वचजण इमानदारीने काम करत आहे. चांगल्या नाटकांना रसिक चांगला प्रतिसाद देत आहेत. एकूणच मराठी रंगभूमीचं बरं चाललाय असं मला वाटत.”
मराठी रंगभूमीने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत आणि आजवर यांना समर्थपणे तोंडही दिले आहे. कोविडनंतर सुरुवातीला शनिवार-रविवार प्रयोग सुरु केले आता सोमवारी-बुधवारी देखील प्रयोग होतायेत ही महत्त्वाची बाब आहे आता हा प्रेक्षक टिकवून ठेवणे आणि वाढवणे ही कलाकारांची जबाबदारी आहे. खऱ्या अर्थाने आता अनेक गोष्टी नॉर्मलाईज झाल्या आहेत, असे म्हणता येईल असेही दामले यांनी नमूद केले.
२०-२५ वर्षांपूर्वी संस्थेच्या नावावर रसिक नाटकांना येत असत. आता ट्रेंड बदलला असून प्रेक्षक आता कलाकाराच्या नावांवर नाटकं चालतात. त्यामुळे कलाकारांवरील जबाबदारी वाढली असल्याचेही दामले यांनी सांगितले.
सध्या नाटकं खर्चिक झाली असली तरी प्रोडक्शनसाठी उत्तम खर्च करावाच लागणार आहे फक्त तो योग्य पद्धतीने आणि विचार करून करायला हवाय असे सांगत दामले पुढे म्हणाले की, “आज मराठी चित्रपट आणि नाटकांना थिएटर मिळत नाही अशी तक्रार असते. पण आज वर्षाला ५०-६० नाटके येत असतील तर ती संख्या कमी करत दर्जा उंचावून प्रेक्षकांना उत्तम कलाकृती देण्यावर आपला भर असायला हवा. कारण रसिक गुणवत्ता पाहूनच थिएटरला येणार आहेत हे लक्षात ठेवायला हवे.”
आज महाराष्ट्रात नाटक सादर करण्यासाठी ९२ सेंटर्स असली तरी, केवळ ४८-४९ ठिकाणीच थिएटर्स आहेत. यातील केवळ १ थिएटर हे अ दर्जाचे आहे. प्राथमिक सोयीसुविधा देण्याचे काम हे सरकारचे आहे. थिएटर चांगल्या पद्धतीने वापरणे हे काम रसिकांचे आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची कला सादर करणे हे काम आमचे कलाकारांचे आहे, त्यामुळे नाट्य परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. राज्यातील सर्व थिएटरवर सोलर सिस्टीम बसविण्यासंदर्भात आम्ही सरकारला विनंती करणार असून यामुळे नाट्यगृहांची भाडी कमी होऊन ती आम्हाला परवडू शकतील अशी माहितीही दामले यांनी दिली.