पुणे – कोरेगावपार्क भागातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2018 मध्ये कोरेगाव पार्क हद्दीत ही घटना घडली होती.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये दाखल अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी वैभव उबाळे व रामकरण चौहान यांची विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. सरकारपक्ष आरोपीच्या विरोधात पुरावा सिद्ध करू न शकल्याने आरोपींची सदर आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकार पक्षाच्या वतीने एकूण 12 साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी पीडित मुलीची साक्ष व पुरावा विश्वासार्ह नसल्याचे निकाल देतानाच न्यायालयाने पीडित मुलीची मैत्रीण हिने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयामधील अधीक्षक यांना तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्याने कामकाज आरोपी रामकरण चौहान यांच्या वतीने ऍड. प्रतिभा पवार यांनी तर आरोपी वैभव उबाळे यांच्या वतीने ऍड. देशमुख यांनी कामकाज पाहिले.