पुणे:- प्राचीन, मुघल, एरर अशी दुर्मिळ आणि प्राचीन नाणी, नाणक संग्राहकांची विविध विषयांवरील व्याख्याने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश असलेल्या ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ या आयसीएसआरआयतर्फे आयोजित राष्ट्रीय पदर्शनाचे आज उद्घाटन झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसाठी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला झाला असून याव्दारे दुर्मिळ नाण्यांची खरेदी-विक्री करण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे.
येथील इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् तर्फे दरवर्षीप्रमाणे ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ या राष्ट्रीय पदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संग्राहक आणि ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. राजन जयकर यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसचे अध्यक्ष किशोर चांडक, उपाध्यक्ष राजेंद्र शहा, सचिव शरद बोरा, खजिनदार नितीन मेहता आणि सहाय्यक सचिव श्याम मोटे उपस्थित होते. सोनल हॉल, कर्वेरोड, पुणे येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे.
यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे आणि महम्मद इस्लामी लिखित ‘अ लिगसी ऑफ बहामनी सुलतानस् थ्रू द कॉइम्स’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाणकशास्त्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल पुणे येथील दिवंगत विजय अग्रवाल यांना (मरणोत्तर), पुणे येथील डॉ. पद्माकर प्रभुणे, बडोत येथील अशोक कुमार जैन आणि मुंबईचे अशोक झुनझुनवाला यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. दिवंगत विजय अग्रवाल यांचा पुरस्कार सविता अग्रवाल यांंनी स्वीकारला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ संग्राहक आणि ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. राजन जयकर म्हणाले की, आपण संग्रह करण्याचा छंद जोपासताना छोट्यात छोटा विषय निवडून सुरूवात करावी. संग्रह करण्यासाठी छोटा विषय निवडला असला तरी त्याच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक असते. त्या विषयाची खोली, व्याप्ती याचाही अंदाज घेणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा संग्रह करणे हा कधीही न संपणारा प्रवास आहे. मी स्वतः 1957 पासून अनावधानाने या विषयाकडे वळलो. मला माझ्या आईकडून प्रोत्साहन मिळाले म्हणून मी आजपर्यंत यामध्ये टिकून आहे.
यावेळी इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसचे गुणवंत शहा आणि मधुसुदन घाणेकर यांच्या संग्रहांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्ती सोलंकी यांनी केले. नितीन मेहता यांनी आभार मानले.
यानंतर दुपारच्या सत्रात पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्यातर्फे मेट्रो कॅरिड कव्हर या विशेष टपाल पाकीटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महामेट्रोच्या ऑपरेशन विभागाचे संचालक विनोदकुमार अग्रवाल उपस्थित होते.
या प्रदर्शनात अतिप्राचीन नाणी या प्रदर्शनात बघायला उपलब्ध असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे या प्रदर्शनात पहायला मिळत आहे. या प्रदर्शनात ५० फ्रेम्स लावण्यात आल्या असून अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचे नाणक संग्रह पुणेकरांना पहायला मिळत आहेत. भारतातील विविध ठिकाणांहून हे संग्राहक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात ब्रिटीश काळात वारण्यात आलेले मेडल, एरर कॉईन्स, स्टेट कॉईन्स, वर्ल्ड कॉईन्स, शिवराई आणि मराठा कॉईन्स आणि दुर्मिळ असे वर्ल्ड कलर कॉईन्स मांडले आहेत. तसेच बॉम्बे पोस्ट कार्डचा इतिहास आणि जागतिक कागदी चलनाविषयी सविस्तर माहिती याठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. यानिमित्त दुर्मिळ नाण्यांची खरेदी आणि विक्रीची संधी पुणेकरांना मिळाली आहे. तसेच यानिमित्त तुमच्याकडे उपबल्ध असलेल्या नाण्यांची ओळख, अंदाजे किंमत, त्यांचे वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे याविषयीची मार्गदर्शनपर माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहे.