पुणे–“हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं? या पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त होत उत्तर देणं टाळलं.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीच्या संदर्भात मेळाव्याचे आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या संदर्भातील अनेक खुलासे केले. त्यात त्यांनी अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधीवरही भाष्य केले. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झालं असतं असं म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या. याच मुद्द्याबाबत आज अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
“मी याआधीच सांगितल की मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. ज्यावेळेला मला वाटेल तेव्हा मी बोलेल. तो माझा अधिकार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेसाठी ऑफर केली होती, त्यावर ते म्हणाले की मी काहीही बोलणं आणि गैरसमज करणं बरोबर नाही आणि ‘नो कमेंट्स’ असं म्हणत ते थांबले.