पुणे— अहमदाबादेतील यूएन मेहता रुग्णालयात प्रकृती खालावली म्हणून दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीची चौकशी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहून केली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आईच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्याचं कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रुग्णालयात धाव घेऊन आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. देशविदेशातील अनेक राजकारण्यांनी मोदी यांना पत्रं लिहून आणि फोन करून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच मातोश्री हीराबेन यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.
तुमच्या मातु:श्री अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तुम्ही त्यांना काल भेटण्यासाठी गेला होतात. तुमच्या आईची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ऐकून बरं वाटलं. तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे आणि तुम्ही आईच्या किती जवळ आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगाची मला जाणीव आहे, असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.
‘आई हे पृथ्वीवरचं सर्वात पवित्र नातं आहे. तुमच्या जडणघडणीत तुमच्या आईचा मोलाचा वाटा आहे. आई ही तुमची अखंड ऊर्जास्त्रोत राहिली आहे. तिची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो व तिला निरोगी दीर्घायुष्य लाभो,’ अशी सदिच्छाही पवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे.