आपण कशामागे धावतोय याचा विचार करा

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे– “आजच्या तरुणाईला समजून घेणाऱ्या मित्रांची गरज आहे आणि ती गरज सोशल मीडिया पूर्ण करू शकत नाही. या व्यासपीठावर ज्ञान घेण्यापेक्षा ज्ञान देण्यावर लोकांचा जास्त भर असतो. सोशल मीडिया हा सेलिब्रेशनसाठी नाही तर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण कशामागे धावतोय याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा,” असे मत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.

डिजिटल मीडियाप्रेमी मंडळीतर्फे आयोजित व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंटस् सहआयोजित मराठी सोशल मीडिया संमेलनाचा दुसरा दिवस प्रात्यक्षिकांवर आधारित सत्रांनी रंगला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे संमेलन होत असून यावेळी सहभागींनी सोशल मीडियावरील त्यांचे प्रयोग आणि अनुभव याबाबत मार्गदर्शन केले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात जगताप यांनी ‘व्यक्त होण्यापूर्वी आणि होताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संमेलनाचे आयोजक मंगेश वाघ, समीर आठल्ये, प्रदीप लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, सोशल मीडिया हा सेलिब्रेशनसाठी नसून त्यातून खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश पोहोचणे आवश्यक आहे. सोशल मीडियाची भिंत ही कलात्मक पद्धतीने रंगवली गेली पाहिजे. मात्र अनेकदा आपण त्यावरील वाद-प्रतिवादाच्या प्रवाहात वाहवत जातो. असे न होता सोशल मीडियाचा वापर करताना आपण नेमके कशामागे धावत आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

‘आग्रह -दुराग्रहाच्या पल्याड भाषा व सोशल मीडिया’ या विषयावर प्राध्यापक डॉ. विश्राम ढोले यांच्याशी डॉ. प्रभाकर देसाई यांनी चर्चा केली. यावेळी बोलताना ढोले म्हणाले, समाज माध्यमांमुळे भाषा व्यवस्थेवर खूप खोलवर परिणाम होत आहे. भाषिक अभिव्यक्तीचे आकुंचन, शब्दधारित भाषेला चित्रधारित भाषेचे बंधन, यंत्राच्या आधारे होणारी भाषेची अभिव्यक्ती असे विविध परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे भविष्यात आपली भाषिक अभिव्यक्ती टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे,” असे  मत ढोले यांनी व्यक्त केले.

“प्रांतनिहाय भाषेच्या वेगवेगळ्या शैली असून त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. त्यांना त्यांच्या परिघामध्ये सन्मान दिलाच पाहिजे. समाज माध्यमामुळे बोलींच्या छटा, प्रांतीय छटा बोलण्यात आले तर ती खूप स्वागतार्ह आहे. मात्र, त्याचबरोबर समाज माध्यमांमुळे एकूणच भाषा या व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाकडे आपण लक्ष दिले पाहिजे. येत्या काही काळात भाषानिर्मितीचे स्थान यंत्र हे होईल. या नवीन आव्हानापुढे आपण आपली भाषिक अभिव्यक्ती कशी टिकवून ठेवणार याचा विचार झाला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

‘कंटेट कडक्क होण्यासाठी’ या विषयावर मार्गदर्शन करताना मुंबई विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय रानडे म्हणाले, “सोशल मीडिया हे समाजातील वंचित घटकांसाठी अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. समाजामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यांना वर्षानुवर्षे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. सोशल मीडियामुळे त्या घटकांना आवाज मिळाला आहे. ते अभिव्यक्त होत आहेत. ही अभिव्यक्ती अतिशय विलक्षण असते. सोशल मीडियाने प्रत्येक व्यक्तीस सीमाविरहित जग उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमामुळे कोणीही, कुठेही, कोणाशीही संवाद साधू शकतो. सोशल मीडियाने तुम्हाला जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा वापर कसा करायचा याचा निर्णय आपण घ्यायचा आहे.”

लेखक सॅबी परेरा यांनी ‘हजारो लाइक्स, कमेंट्सः कसं काय?’ या विषयातून लाइक्स आणि कमेंट्सचे गणित उलगडून सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर लाइक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी काय तंत्र वापरले जाते याविषयी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यामध्ये पोस्टचा विषय कोणता निवडावा, लोक कोणत्या पोस्ट वाचतात यावर लाइक्स अवलंबून असतात असे सांगितले. पोस्टला अनुसरून असलेले हॅशटॅग, टॅगिंग, पोस्टमधील रंगसंगतीची निवड, साइन टू अक्शन, पोस्ट टाकण्याची वेळ, ट्रॅक्शनमधील सातत्य या सर्व गोष्टींवर लाइक्स आणि कमेंट्सचे गणित अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.

गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ‘सकारात्मक ट्रॅक्शनचा ट्रॅक’ या विषयावर बोलताना प्रत्यक्षात आलेले उपस्थितांसमोर मांडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलानिर्मिती कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. हा प्रयोग कसा सुचला, तो कसा राबवला गेला आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला याविषयीचे अनुभव कुलकर्णी यांनी यावेळी कथन केले. लाइव्ह ऑडिशनमध्ये देशविदेशातील कलाकारांनी नोंदवलेला सहभाग आणि त्यातील काही कलाकारांची निवड करून केलेल्या संगीत रचना ही सर्व प्रक्रिया त्यांनी उलगडली. सोशल मीडियाची ताकद योग्यप्रकारे कशा वापरून सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करता येते याचे उदाहरण त्यांनी या माध्यमातून दिले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *