तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा हवा : तरुण आमदारांचे मत

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असला पाहिजे, असे मत तरुण आमदारांनी व्यक्त केले. ‘डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये  ‘राजकारणातला सोशल मीडिया’ या विषयावर तरुण आमदार बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री अदिती तटकरे, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, विदर्भातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, शिवाजीनगरचे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे यांनी सगळ्या आमदारांना बोलते केले.

आदिती तटकरे म्हणाल्या, “मी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही, अशा पोस्ट आणि थोड्या वैयक्तिक, असे तारतम्य बाळगत सोशल मीडियाचा वापर करते. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. पण आता आम्ही सर्व गोष्टींसाठी तयार झालो आहोत. गोष्टी फेक वाटू नये, अशा तुमच्या पोस्ट असल्या पाहिजेत. मात्र तुमचा सोशल मीडिया हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असला पाहिजे. मात्र २० टक्के महिलाच सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष आणि थेट संवादाला पर्याय नाही.”

देवेंद्र भुयार म्हणाले, “राजकीय अपरिहार्यता म्हणून सोशल मीडियाचा उपयोग होतो. यामध्ये फायदा होतो तसा खूप तोटाही होतो. लोक पहात असतात की तुम्ही नेमके काय काम करत आहात. सोशल मीडियावर काम दिसले नाहीत, तर लोक विचारतात की तुम्ही नेमके काय करता.” भुयार म्हणाले की व्हाट्सअॅप वर महिला जास्त आहेत, त्यामुळे खूप वेळा थेट आणि प्रत्यक्ष संवाद हवाच.

रोहित पवार म्हणाले की, “भारतातील ६० टक्के लोकसंख्या ही ४० वयाच्या खालची आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून केला जातो. ते म्हणाले, “नेमके काम काय करतो, हे सांगण्याचा आणि व्यक्त होण्याचा माझा प्रयत्न असतो. माध्यमे आम्हाला कव्हर करत नाही, म्हणून आम्हाला सोशल मीडियाचा उपयोग होतो.”

ते म्हणाले,” माझ्या स्वभावाप्रमाणे माझा सोशल मीडियाचा वापर आहे.  मात्र सर्व माध्यमांचा उपयोग करावा लागतो. आणि प्रत्यक्ष संवाद ठेवावा लागतो.” ते म्हणाले, भाजपकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यात सोशल मीडियाचा वापर कसा करावा, हा भाग येतो.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “अनेकवेळा औपचारिकता म्हणून सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडिया हा तुमच्या कामाचा दस्तऐवज असतो. तुमच्या स्वभावाप्रमाणे तुमचे सोशल मीडिया अकाऊंट असते. मी त्याचा रचनात्मक कामासाठी उपयोग करून घेतो.” ते म्हणाले की सोशल मीडियावर वावरताना आपली एक आचारसंहिता असावी. पर्सेप्शन आणि वास्तवता याचा त्यामध्ये समतोल असावा.  मात्र प्रत्यक्ष संवाद हवाच आणि त्याला सोशल मीडियाची जोड हवी.

योगेश कदम म्हणाले, “व्यक्तिगत जीवनात आम्ही काय करतो, यावर लोकांचे लक्ष असते. त्यामुळे वैयक्तिक जीवनातील पोस्टना पसंती मिळते. मी नकारात्मक पोस्ट बघत नाही. त्यामुळे मला ताण येत नाही. मी या व्यासपीठाचा उपयोग शिकण्यासाठी करतो. यावर येणाऱ्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात. मात्र, तरीही जुन्या माध्यमांचा उपयोग आम्ही चालूच ठेवला आहे. कारण तो थेट आहे.” यावेळी उपस्थित प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांनी तरुण आमदारांना अनेक प्रश्नही विचारले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *