पुणे(प्रतिनिधि)–यावर्षी उन्हाळा अधिक उष्ण ठरत आहे. त्याचा फटका फळांचा राजा असलेल्या आंब्याला बसला आहे. उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहे. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशावर गेल्याने फळांचा राजा असलेल्या हापूसला सध्या त्याची चांगलीच झळ बसत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच लहरी वातावरणामुळे कोकणातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे, पहिल्या टप्प्यात झाडांवर अवघी 25 टक्केच फळे राहिली. याकाळात, बाजारातील आवक घटून हापूसला चांगले भाव मिळत होते.
तर, मार्केटमध्ये आंबा दाखल झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान असल्याने आंबा गरम होऊन कोईपाशी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारण वातावरण असताना आंबा तयार होण्यासाठी ताडपत्रीने झाकून ठेवणे तसेच भट्टी लावण्यासारखे प्रकार व्यापारी वर्गाकडून करण्यात येतात. मात्र, सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे आंब्याच्या पेट्यांना फॅनद्वारे हवा देऊन थंड ठेवणे सुरू आहे. मात्र, वातावरणात उष्णता जास्त असल्याने करण्यात येत असलेले प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
मार्केट यार्डात नेहमीच्या तुलनेत सध्या अवघी 30 टक्के मालाची आवक होत आहे. पहिल्या टप्प्यातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी होत आहे. आंबा खराब होऊ नये यासाठी तो थंड ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, उष्णता जास्त असल्याने सर्व प्रयत्न अपुरे ठरत आहे. जोपर्यंत वातावरणात जास्त उष्णता राहील तोपर्यंत हीच परिस्थिती राहिल असे आंब्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.