हास्याचे फवारे,टाळ्या आणि शिटयांनी रंगले ‘हास्यधारा’ मराठी कवी संमेलन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलनामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी सादर केलेल्या विनोदी प्रेम कविता आणि राजकीय विडंबनाने हास्याचे फवारे उडाले. टाळ्या आणि शिट्या  वाजवत रसिकांनी बालगंधर्व मंदिर दणाणून सोडले. त्याचबरोबर स्रीत्वाची जाणीव करून देणाऱ्या, सामाजिक कवितांनी रसिकांना अंतर्मुखही केले.

34व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलन गुरुवारी पार पडले. या कवी संमेलनात मृणालिनी कानेटकर, अंजली कुलकर्णी, संजीवनी तडेगावकर, भरत दौंडकर, नारायण पुरी, नितीन देशमुख, अनंत राऊत, अनिल दीक्षित, गुंजन पाटील, चरण जाधव हे राज्याच्या विविध भागातून आलेले नामवंत कवी सहभागी झाले होते. ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन केले.

कवी नारायण पुरी यांनी सादर केलेल्या

ते म्हणाले की दूर दृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला, म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरुन विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली, दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर मेक इन कार्यक्रमांतर्गत मंन की बात करताना अच्छे दिन नावाचं गाजर दाखवलं. ते म्हणाले, गाजरात ‘अ’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने ते दृष्टीस फायद्याचे असतात. आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजरं चघळत चघळत विकास पाहायला लागलो. तर परत म्हणाले, ज्यांची दृष्टी निकोप आहे त्यांनाच फक्त विकास दिसेल, ज्यांना दृष्टिदोष आहे त्यांनी गाजर खावे. 

 या राजकीय विडंबनाला हास्याचे फवारे उडाले आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून रंगमंदिर डोक्यावर घेतले.

त्यांनी सादर केलेल्या

                 ऐक सखेबाई माझी पिरतीची कथा

                 काय सांगू मी तुझ्यावर कसा झालो फिदा

या प्रेम कवितेलाही रसिकांनी दाद दिली.

मृणालिनी कानेटकर यांनी

                     निवडणं पाखडणं उभ्या जन्माचं दळण, चूल पेटता पेटेना किती लोटलं जळण..

                     वाट काट्याकुट्यातली माझ्या दाराशी थांबते, लख्ख उन्हाची दुपार डोईवर झळाळते… 

 ही स्री जाणिवेची कविता सादर करताना स्री कुटुंबासाठी राबते तरीही ती निर्णय प्रक्रियेत का नसते? याचा अंतर्मुख विचार करायला लावणारी स्रीची व्यथा मांडली.

गुंजन पाटील या महाविद्यालयीन कवियत्रीने प्रेमातला भ्रष्टाचार ही कविता सादर करताना स्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा आहे हे

                   हल्ली कोणाचं काय सुरू आहे, काहीच मेळ लागत नाही,

                   एक मोबाइल तीन- तीन सिम, एकावर कोणाचचं भगत नाही

                   तु माझं लपव मी तुझं, हाच शिष्टाचार आहे

                   हल्ली प्रेमात, सारा भ्रष्टाचार आहे …

या कवितेतून सादर केले. त्याला रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

गुंजन पाटील यांनी सादर केलेल्या.. 

                            कुणाचं कुणासाठी कुठे दुखतं, कुणाला कधी काय खुपतं

                            कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळीज जळतं

                            खरंच सांगते मुलींना सारं काही कळतं..

या ‘मुलींना सारं काही कळतं’ कवितेलाही रसिकांनी दाद दिली.

अनिल दीक्षित यांनी   

                 एकनाथ मधला ‘ई’ आणि देवेंद्र मधला ‘डी’, काय कॉम्बिनेशन झालय

                 खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात ‘ईडी’चं सरकार आलंय ..

या रचनेला आणि

                टपाल दिनानिमित्त प्रत्येकाने एक- एक पत्र लिहावं  असे आवाहन करण्यात आल्यानंतर काही राजकीय मंडळींनी आणि इतर मंडळींनी आपल्या मनातील खंत मिष्किलपणे आपल्या हिटचिंतकांच्या समोर पत्राद्वारे आणि कवी नारायण सुर्वे यांच्या ‘पत्रात लिव्हा’ या कवितेवर आधारित कशी मांडली यावर विडंबनात्मक कविता सादर केली. त्यांनी

             सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा, परंतु माझ्या इंजिनाला मिळतो एकच डबा

             मी संभाच घेऊ का नको, मी व्हिडिओ दाखऊ का नको, काय ते पत्रात लिव्हा..

    आणि

             पुन्हा मी येईन म्हटलो, झालो उपमुख्यमंत्री

             प्रगती म्हणू की अधोगती, कळेनाच केमिस्ट्री

             मी शपथ घेऊ का नको, काय ते पत्रात लिव्हा..

अशा सादर केलेल्या रचनांना रसिकांनी टाळ्यांचा आणि शिटयांचा गजर करत प्रतिसाद दिला.

संजीवनी तडेगावकर यांनी सादर केलेल्या,

                                 रांगोळीत तुला काढताना मीच विस्कटून गेले

                                 तर तु मला म्हणालास रंगाचं असचं असतं

                                 आखडून पाखडले, निवडून घेतले, तरी चुकून आलाच दाताखाली

                                 तेव्हा मी म्हणाले, खड्यांचं असतं..

नवरा बायोकोच्या संवादावार आधारित कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली.

अनंत राऊत यांनी सादर केलेल्या

               बऱ्याच दिवासानं त्या झोपडीत लखलखाट दिसतोय

               शेतकऱ्याचं नशिब फळलं का काय ?

               दिवाळी नाय, दसरा नाय यानं घरातच प्रेत जाळलं का काय?

 या कवितेच्या दोन ओळीने मात्र, वातावरण गंभीर झाले आणि सर्व उपस्थित अंतर्मुख झाले.

तर

           भोंगा वाजलाय.. भोंगा वाजलाय .. भोंगा वाजलाय.. वाजलाय.. वाजलाय ..

           नेता गाजलाय .. नेता गाजलाय..  नेता गाजलाय.. गाजलाय.. गाजलाय ..

           पोटा पाण्याची सोडून कामं, म्हणा जय जय श्रीरामा..

           करी सीतेला उपवास, माय बापाले वनवास..

           घरची अयोध्या जळताना, प्रश्न रामाला पडलाय.. 

भोंगा वाजलाय.. भोंगा वाजलाय .. भोंगा वाजलाय.. वाजलाय.. वाजलाय ..

या कवितेला रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

भरत दौंडकर यांनी

                विवेकाचा फिरला माथा, नथुराम जीवंत आहे की गांधी?

                अंदाज येत नाही…. 

ही सद्यस्थितिवरची ‘अंदाज येत नाही’ ही कविता सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.

नितीन देशमुख यांच्या

                   उगाच घेते नाव सखे तू, माझे का प्रेमाने

                   डाळिंबाच्या ओठावरती कडु लिंबाचे गाणे..

                   घर हृदयाचे सोडून गेली असे वाटले तेव्हा

                   मधमाश्यांच्या पोळ्यामधले मकरंदाचे जाणे.. 

अशा गझल सादर केल्या. अंजली कुलकर्णी आणि चरण जाधव यांनीही आपल्या कविता सादर केल्या.

पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, प्रसन्न गोखले, शीतल शहा, श्रीकांत कांबळे आणि मोहन टिल्लू या मान्यवरांच्या हस्ते कविंचा सत्कार करण्यात आला. व्हॉलीयंटर म्हणून काम करणाऱ्या एनआयआम संस्थेच्या सर्व टीमचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *