महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा नकोत- चित्रा वाघ

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : “महिलांना संघर्ष हा नविन नाही. त्यांना फक्त लढ म्हणत कौतुकाची थाप देण्याची गरज असते. ‘मी घरात बसेन आणि मला सन्मान मिळावा’ अशी अपेक्षा कोणीही ठेवता कामा नये. आपल्या स्वतःला आणि समाजातील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी महिलांची एकी महत्वाची आहे. तसेच महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा उपयोगाच्या नाहीत, तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे,” असे मत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पद्मा प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्त्री-शक्ती सन्मान २०२१’ वितरण सोहळ्यात चित्रा वाघ बोलत होत्या. प्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, खासदार गिरीश बापट, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक डॉ. संजय चोरडिया, सारसबाग महालक्ष्मी ट्रस्टचे विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सरचिटणीस मनोज भोरे, गुरुजी तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, पद्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, गणेश बेंबरे, अभिजित बोरा, निखिल निगडे, गौरव नाईक, हर्षद दौंडकर आदी  उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘स्त्री-शक्ती सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, समुपदेशिका अर्चिता मडके, अतिरिक्त आयुक्त डॉ रूबल अग्रवाल, उद्योजिका रेखा चोरगे, पत्रकार आश्विनी डोके-सातव, गायिका मनीषा निश्चल, सामाजिक कार्यकर्त्या सारिका खळदकर, उद्योजिका प्रिया येमुल, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा देडगे, माध्यमतज्ञ सायली नलावडे-कविटकर, सामाजिक कार्यकर्त्या पूजा वाघ, जिव्हाळा परिवार यांचा समावेश होता.
चित्रा वाघ म्हणाल्या, “मूठभर महिला शिकून पुढे गेल्या म्हणजे महिला सक्षमीकरण नाही. आजही ग्रामीण भागात, शहरात अनेक महिलांना सन्मानाने वागवले जात नाही. कायदे झालेत; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. आजही त्यांना न्यायासाठी झगडावे लागते. वासनांध लोकांच्या शोषणाला बळी पडावे लागते. हे थांबण्याची गरज आहे. या महिलांमध्ये मोठी शक्ती आहे. मात्र, त्यांना योग्य ती संधी आणि पोषक वातावरण निर्माण करून दिले, तर ही नारीशक्ती समाजाची जडणघडण अतिशय चांगली करेल. बदलती कुटुंबव्यवस्था ही चिंतेची बाब आहे. जिजाऊ, सावित्रीबाई यांचा आदर्श ठेवून त्यांचे विचार जगण्याचा प्रयत्न व्हावा. समाजातील घाणेरड्या विचारांचा नायनाट करून समता प्रस्थापित व्हायला हवी.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “महिला सातत्याने चांगले काम करत असतात. घर, संसार, करिअर अशा विविध घटकांची जबाबदारी त्या एकाचवेळी पेलतात. त्यांच्यातील या अष्टपैलू शक्तीचा सन्मान केवळ महिला दिनापुरता मर्यादित राहू नये. आगामी काळात महिला एवढ्या सक्षम होतील की, भविष्यात महिला दिनासारखा पुरुष दिनही साजरा करावा लागेल. सूर्यदत्ता संस्थेत महिलांना प्रोत्साहन देण्यासह सन्मानही दिला जातो. लवकरच महिला सक्षमीकरणासाठी ‘सूर्यदत्ता वुमेन्स एम्पॉवरमेंट अकॅडमी’ सुरु केली जाणार आहे.”

सचिन ईटकर म्हणाले, “महिलांमुळेच जगाचा इतिहास प्रेरणादायी झाला आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्वराज्याची प्रेरणा ही जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातही महिला अग्रेसर होत्या. सद्यस्थितीमध्ये महिला शिक्षण धोरण अधिक बळकट बनवून महिलांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणे गरजेचे आहे.” जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. शशिकांत कांबळे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *