संत तुकारामांचा ‘उंच नीच काही नेणे भगवंत’ हाच घेऊन विचार आमचे सरकार काम करत आहे – पंतप्रधान मोदी

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे—‘उंच नीच काही नेणे भगवंत’, यासारख्या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये उच्च-नीच दृष्टीकोन, माणसा-माणसात भेद करणे हे खूप मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा उपदेश भगवद्भक्तीइतकाच राष्ट्रभक्तीसाठीदेखील महत्त्वाचा आहे. वारकरी बांधवही हा संदेश घेऊन दरवर्षी वारीमध्ये भक्तीचा जागर घडवत असतात. हाच विचार घेऊन आमचे सरकारदेखील कोणताही भेदभाव न बाळगता व सर्वांना सोबत घेत प्रत्येक योजना पुढे नेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे केले.

 देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मोदी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, जगद्गुरु श्री संत तुकाराम देवस्थानचे नितीन महाराज मोरे देहूकर, मारुतीबुवा कुऱहेकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज आदी या वेळी उपस्थित होते.   

मोदी म्हणाले, देहू ही अतिशय पावन अशी संतशिरोमणी तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. संतांच्या पावन स्पर्शाने ओतप्रोत भरलेल्या या भूमीतील प्रत्येक गोष्टही संतस्वरूप आहे. ‘धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव । पांडुरंग | या अभंगातून देहूगावची महतीच सांगण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे आज आपण लोकार्पण केले आहे. हे शिळा मंदिर बोध आणि वैराग्याचे साक्षीदार असून, ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाची आधारशिलाच आहे. भक्तीची ही शक्ती भारताचे सांस्कृतिक भविष्यच प्रशस्त करते. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. हा अमृतमहोत्सव साजरा करताना आपण अतिशय प्राचीन अशा जिवंत सभ्यतेपैकी एक आहोत, हे लक्षात येते. याचे श्रेय संतपरंपरेला जाते. भारत ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये प्रत्येक युगात देशाला योग्य दिशा देईल, अशा थोर विभूती व संतांच्या स्वरूपात जन्माला आल्या आहेत. संत निवृत्तीनाथ, संत सोपान महाराज यांसारख्या महान विभूतींनी भारताला गतिमान करण्याचे काम केले. वेळोवेळी जागृत केले. संत बहिणाबाईंनी तर संत तुकाराम महाराजांचा या संत परंपरेतील ‘कळस’ म्हणून उल्लेख केला.

 संत तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवन संघर्षामध्ये दुष्काळ, भूक, महामारी यांसारख्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, या स्थितीतही ते समाजासाठी आशेचा एक किरण म्हणून उभे राहिले. संत तुकाराम महाराजांनी आपली संपत्ती अनेकदा लोकांच्या सेवेत अर्पण केली, याचे अनेक दाखले इतिहासात आपल्याला सापडतात. आजचे लोकार्पण झालेले शिळा मंदिर हे त्याच वैराग्याचे साक्षीदार आहे. हे मंदिर आपल्याला दया, सेवा, क्षमा अशा गुणांचे दाखले हजारो वर्ष देत राहील. महाराजांनी आपल्याला अभंगातून या सर्व गोष्टी दिल्या आहेत. हे अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारी गोष्ट आहे. म्हणून ते ‘अभंग’ आहेत. ते पिढय़ान् पिढय़ा आपल्याला प्रेरणा देत राहणार आहेत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

 रंजल्या गांजल्यांचे कल्याण हाच प्राधान्यक्रम 

 ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ या अभंगाचा दाखला देत पंतप्रधान पुढे म्हणाले, संतांनी आपल्याला अगदी तळागाळातील व्यक्तीलाही जपा, अशी शिकवण दिली आहे. म्हणूनच दलित, वंचित, तळाच्या वर्गातील सर्वांचे आपल्याला कल्याण करायचे, हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. संत ही एक उर्जा आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातदेखील संत तुकारामांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली. सावरकर अंदमानमधील कारागृहामध्ये शिक्षा भोगत होते, त्यावेळेस त्यांनी हातातील बेडय़ांना चिपळी करत विठ्ठल नामाचा जयघोष केला.  संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये ऊर्जा असून, त्यातून प्रत्येकास प्रेरणा मिळत आहे. 

 सबका विकासकरिता वारीतून प्रेरणा 

 वारीसारख्या परंपरेतून संतांनी एकात्मतेची भावना वाढीला लावली आणि रुजवली. या वारीची प्रेरणा घेऊन देशसुद्धा ‘सर्वांची साथ सर्वांचा विकास’ या प्रेरणेतून पुढे जात आहे. वारीमध्ये जसा कोणताही भेदभाव नसतो. त्याचप्रमाणे सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये सर्वांना समान लाभ मिळेल हाच एक विश्वास घेऊन आपण पुढे चाललो आहोत. या प्राचीन परंपरा अबाधित राखणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. विकास आणि परंपरा या दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. मात्र, या दोहोंचा मेळ साधला पाहिजे, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली. 

 मोदी हे वारकरी : फडणवीस 

 कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिळामंदिर लोकार्पण सोहळय़ासाठी अखिल विश्वातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी येणे, हे आनंददायी आहे. तुकोबांनी समाजाला दिशा दिली. अंधश्रद्धा, बुवाबाजी फोफावलेली असताना तुकोबांनी भागवत धर्माला जागृत केले. शब्दाचे जे धन दिले, त्यात इतकी ताकद होती, की ते बुडवता आले नाहीत. जे का रंजले, गांजले; त्यासी म्हणे जो आपुले, हा तुकोबांचा विचार मोदी यांनी प्रत्यक्षात आणला. सबका साथ सबका विश्वास, असा नारा देत गरीब कल्याणासाठी मोदी आज काम करत आहेत. त्या अर्थी ते वारकरी आहेत. तर नितीन महाराज मोरे म्हणाले, आजही तुकोबारायांचे विचार अनुकरणीय आहेत. 

 पालखी मार्गासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च 

 संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा विस्तार हा पाच टप्प्यांमध्ये, तर संत ज्ञानेश्वर पालखी मार्गार्चा विस्तार तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी या वेळी सांगितले. 

 अजितदादांना भाषणाची परवानगी नाही

 पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भाषणापूर्वी विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषणाची परवानगी दिली गेली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी दिली जाते, मग पालकमंत्र्यांना का दिली गेली नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला. 

 अजितदादांच्या खांद्यावर पंतप्रधानांचा हात 

 दरम्यान, पुणे दौऱयावर आलेल्या पंतप्रधानांचे सकाळी अजित पवार यांनी लोहगाव विमानतळ येथे स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनी या स्वागताचा स्वीकार करत अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला. बघता बघता हा फोटो व्हायरल झाला आणि समाजमाध्यमावर याची चर्चा पसरली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *