चराचरात श्रीराम : गीतरामायण व श्रीपंत महाराज


चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव निमित्त रामनवमी  सप्ताह आणि रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो.

रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये या निमित्ताने किर्तन व प्रवचने आयोजित केली जातात.  असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते. पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य होत चाललेल्या रेडिओ सेवेवर मात्र मराठी संगीतातील अजरामर असे “गीतरामायण” आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित केले गेले. आजही महाराष्ट्रातील विविध आकाशवाणीच्या केंद्रांवरून या गीतरामायणातील गीते प्रसारित केली जातात.

गीतरामायण या संगीत काव्याची निर्मिती मराठीतील अजरामर गीतकार व महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच गदिमा यांनी केली आहे. गदिमांच्या या बहारदार काव्याला संगीत साज चढवून ते रसिकांपर्यंत आणण्याचे काम स्वरतीर्थ सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांनी केले.

२ ऑक्टोबर  १९५३ या दिवशी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.  गीतरामायण हा इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व व संगीतबद्ध केलेला कार्यक्रम १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्राने प्रसारित केला. गदिमांचे सीताकांत लाड नावाचे मित्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम अधिकारी म्हणून होते. नभोवाणीसाठी म्हणजेच आकाशवाणीसाठी गदिमांनी काहीतरी लिहावे असा त्यांनी गदिमांना आग्रह केला व यातूनच ” गीतरामायण ” या महाकाव्याचा जन्म झाला

अधिक वाचा  राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रने दिली गुड न्यूज : सावनी म्हणाली...

रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी यांनी २८ हजार श्लोकात जी रामकथा लिहिली ती गदिमांनी ५६ अजरामर अशा गीतांमधून शब्दबद्ध करण्याचे काम केले. ” स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती” या गीतापासून ते ” गा बाळांनो श्रीरामायण”  या गीतापर्यंत सर्व ५६ गीतांना बाबूजींनी संगीतबद्ध करून लोकांसमोर आणले.  गदिमांच्या शब्दांमध्ये अजोड अशी एक शक्ती होती. व हीच शक्ती बाबूजींनी आपल्या सुमधुर आवाजाने संगीतबद्ध करून रसिकांपर्यंत पोहोचविली.

गीतरामायण लिहून ते संगीतबद्ध होऊन ते आकाशवाणीच्या केंद्रांवर प्रसारित होण्याची सर्व प्रक्रिया शिक्षणाचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात पार पडली.  गदिमा गीत लिहून झाल्यावर ते गीत पुढे बाबूजींकडे पाठवत व बाबूजी त्या गीताला स्वरबद्ध करून ते गीत आकाशवाणीवर ठराविक कालावधीने प्रसारित केले जाई. 

१८५५ ते १९०५ या कालावधीत कर्नाटक राज्यातील बाळेकुंद्री या गावचे दत्तात्रेय रामचंद कुलकर्णी या नावाने प्रसिद्ध असलेले “श्रीपंत महाराज” हे थोर सद्गुरू होऊन गेले. श्रीपंत महाराजांनी गृहस्थाश्रम धर्म स्वीकारून विद्यादानाचे पवित्र असे कार्य केले व सद्गुरू बालमुकुंद महाराज यांचेकडून आलेला अवधूत सांप्रदाय महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तांपर्यंत सद्गुरुभक्ती, बंधुप्रीती व आत्मशांती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पोहोचविला.

श्रीपंत महाराजांचे भाचे शंकर विरूपाक्ष पट्टीहाळ यांचा पुणे शहरात वाडा होता. त्याचे नाव होते ” पंतकुटी “.  हा वाडा कालांतराने गदिमांनी विकत घेतला व १९५० च्या दशकात याच शंकर विरूपाक्ष पट्टीहाळ यांच्या वाड्यातून गदिमांनी गीतरामायणातील गीते लिहिली.

अधिक वाचा  'टारझन' फेम हेमंत बिर्जे यांच्या गाडीला अपघात

जेव्हा गदिमांनी गीतरामायण लिहावयास घेतले तेव्हा बरीचशी गीते लिहून झाली होती. पण जेव्हा मुख्य रामजन्माचे गीत गदिमांनी लिहावयास घेतले तेव्हा काही त्यांच्या मनासारखी काव्यरचना तयार होत नव्हती असेच दिवसामागून दिवस जात होते पण गदिमांना हवी तशी गीतरचना तयार होत नव्हती. पुणे शहरातील जो शंकर पट्टीहाळ यांचा वाडा गदिमांनी विकत घेतला त्या वाड्यात श्रीपंत महाराजांची प्रतिमा होती, त्या प्रतिमेखालील जागा जतन करून ठेवण्यात आली होती.

कागदावर बरीच अशी शब्दरचना करून झाली पण गदिमांच्या ती काही मनासारखी होत नव्हती. काहीसे मनासारखे काव्य तयार होत नसल्याने बैचेन झालेले गदिमा आपल्या पत्नीला म्हणाले की श्रीपंत महाराजांच्या प्रतिमेजवळ बसून बघावे की काही गीतरचना सुचते का….??? म्हणून गदिमा श्रीपंत महाराजांच्या प्रतिमेच्या जवळ जाऊन बसले व या जागी बसल्यानंतर गदिमांना जे शब्द सुचले ते गीत असे होते. 

।। चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी ।।

  ।। गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती ।।

  ।। दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला ।।

  ।। राम जन्मला ग सखे, राम जन्मला ।। “

यानंतर हे गीत गदिमांनी सुधीर फडके यांच्याकडे पाठवले व बाबूजींनी त्वरीत हे रामजन्माचे गीत संगीतबद्ध करून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ६ मे १९५५ रोजी प्रक्षेपित केले. मिश्र रागातील हे गीत असून ते एकूण १० मिनिटे व २२ सेकंदांचे हे गीत आहे.

अधिक वाचा  शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू

आज जे गीतरामायणातील रामजन्माचे गीत आहे ते गदिमांनी श्रीपंत महाराजांच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रतिमेच्या पावन झालेल्या वास्तूमधून लिहिले आहे. आणि त्यानंतर गदिमांनी तसा उल्लेख देखील केलेला आहे. की “राम जन्मला ग सखे” हे गीत श्रीपंत महाराजांच्या आशीर्वादाने लिहिले गेले आहे. पुढे हे रामजन्माचे गीत संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाले.

पुणे शहरातील ज्या वाड्यात गदिमांनी गीतरामायण लिहिले त्या वाड्यात  माडगूळकर परिवाराने ह्या महत्वाच्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. आज त्या वाड्यात श्रीपंत महाराजांचे भाचे स्व.शंकर विरूपाक्ष पट्टीहाळ यांनी स्थापन केलेला श्रीपंत महाराजांचा एक प्रतिमा व तुळस आहे. याचबरोबर गदिमांच्या संपूर्ण माडगूळकर परिवाराचे श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री, श्रीपंत घराणे व श्रीपंत सांप्रदायाशी एक सलोख्याचे नाते निर्माण झाले असून ते नाते आजही कायम टिकून आहे.

या रामनवमी उत्सवाच्या चराचरात श्रीराम या लेखमालेच्या निमित्ताने विशेष बाब म्हणजे श्रीपंत महाराजांचे आज भारतासह विदेशात देखील भक्तगण आहेत. ५० वर्षाच्या आपल्या आयुष्यात श्रीपंत महाराजांनी अनेक शिष्य घडविले. व आपली स्वरचित २७३० पदांची भजनगाथा प्रेमलहरी लिहिली.

लेखन : आदित्य दिनानाथ कडू

अलिबाग-रायगड

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love