Three suspended including two Sassoon doctors

#हीट अँड रन प्रकरण : ससूनच्या दोन डॉक्टरांसह तिघे निलंबित : अधिष्ठाता डॉ. विनायक काळे तात्काळ सक्तीच्या रजेवर

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)-  पुण्यातील हिट अँड प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर तर ससूनच्या शव विच्छेदन विभागाचा शिपाई अतुल घाटकांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

पुणे अपघात चौकशी प्रकरणी जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली  एक समिती गठीत करण्यात आली होती.  दोन दिवसांपासून त्या पुण्यातील घटनेचा तपास केला. त्यासाठी, पुणे पोलीस आणि रुग्णालय प्रशासनासोबतही त्यांचा संवाद झाला आहे. या समितीने ४८ तासात तपास पूर्ण केला असून ब्लड सॅम्पल अफरातफरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कारवाई संदर्भात माहिती देताना म्हणाले की डॉ. श्रीहरी हळनोरची सेवा समाप्त करण्यात आली आहे. शवविच्छेदन विभागातील अतुल घटकांबळेला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच डॉ. अजय तावरेच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. डॉ. तावरेला अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा अशी विनंती करणारे पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिले होते. त्यावर कार्यवाही करावी असे निर्देश मंत्र्यांनी दिले होते. डॉ. तावरे यांच्या प्रकरणाला मी जबाबदार नाही, असेही काळे यांनी सांगितले.

डॉ. तावरे प्राध्यापक असल्याने विभाग प्रमुख पदासाठी पात्र होते. म्हणून मी त्यांना पदभार दिला. त्यांच्यावर यापूर्वी झालेल्या आरोपांची शासनाला कल्पना आहे. डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचं मला पहिल्यांदा २७  तारखेला कळालं. मी सकाळी ९ पासून रात्री १० वाजेपर्यंत बसून काम करतो. परंतु दुर्दैवाने अशा घटना घडतात.

दरम्यान, ससूनमध्ये १४००  पीएम रिपोर्ट पेडिंग असल्याचे काळे यांनी सांगितले. याबाबत माहिती घेऊन पीएम रिपोर्टसाठी पैसे घेतले जातात, या तक्रारीबाबत चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. ससूनमध्ये दिवसाला सरासरी २४ मृत्यू होतात, अशी माहिती आजच कळाली आहे. इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन ससूनमधील रुग्णांच्या मृत्यूबाबतचा तपशील सांगणार असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. विनायक काळे यांनी काढला पळ

दरम्यान, बिल्डर विशाल अग्रवालच्या पोराला गुन्ह्यातू वाचवण्यासाठी लाखो रुपये ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकून देणाऱ्या ससून रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभाागाचा डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळवरून प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यानंतर पत्रकार परिषद सोडून आधिष्ठाता  विनायक काळे यांनी काढता पाय घेतला. आरोपी तावरेच्या संदर्भात प्रश्नांची उत्तरे न देता विनायक काळे तडक उठून निघून गेले.

 जर्मनीचे पथक पुण्यात येऊन कारची करणार पाहणी

या अपघातात अलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात झाल्याने त्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या. असा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला आहे. त्यामुळे याबाबत पोर्शे कार कंपनीचे पथकाने पुण्यात येऊन कारची पाहणी करण्याचे ठरवले आहे. सदर पोर्श कार कंपनी मूळची जर्मनची असून, त्याठिकाणचे त्यांचे प्रतिनिधीदेखील या कारची पाहणी करून तांत्रिक गोष्टी तपासून त्याबाबतची माहिती आरटीओ व पोलिसांसोबत आदानप्रदान करणार आहे.

 पोर्शे कार ताडपत्रीने झाकली

कल्याणीनगर येथील अपघातातील दोन कोटी ६४ लाख रुपयांची महागडी पोर्शे कार पिवळी ताडपत्री टाकून पोलिसांनी झाकून टाकली आहे. तसेच कारच्या बाजूने बॅरिकेट लावण्यात आले आहे. अपघातातील गाडीमधील पार्ट चोरीस जाऊ नये किंवा त्यातील पुरावे नष्ट हेऊ नये, याकरिता संबंधित गाडी झाकली गेली आहे. तसेच पावसाळा सुरू होणार असल्याने गाडीतील तांत्रिक गोष्टींना धोका निर्माण होऊ नये, याकरिता ती झाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रथमच एखाद्या अपघातातील पोलीस स्टेशनमधील गाडी झाकल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *