पुणे – सोसायटी आणि गणेश मंडळांच्या गणेशोत्सवाच्या गर्दीत मगरपट्टा सिटी ग्रुपच्या मगरपट्टासिटी व नांदेडसिटी या दोन्ही सुविधा संपन्न व परिपूर्ण शहरांमध्ये मात्र ‘एक गाव – एक गणपती’ प्रमाणे संपूर्ण शहराचा एक गणेशोत्सव मोठ्या थाटमाटात साजरा केला जातो आहे. सर्वांनी एकत्र येऊन संवाद, एकोपा वाढविणारा हे गणेशोत्सवाचा हेतू साध्य करणारा व शहराची एक संस्कृती निर्माण करणारा हा गणेशोत्सव ठरतो आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही शहरांमध्ये अगदी सुरवातीपासून अशाच रितीने गणपती उत्सवांसह विविध सण साजरे केले जात आहेत. मगरपट्टासिटीमधील अशा गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी पुणे शहर पोलिसांनी पुरस्कार देवून गौरव देखील केला आहे.

मगरपट्टासिटी व नांदेडसिटी या दोन्ही शहरांमध्ये दहा दिवसांच्या गणपती उत्सवाचे आयोजन केले गेले आहे. या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये मगरपट्टासिटीत सुमारे दहा तर नांदेडसिटीतील सुमारे बारा हजारांहून अधिक कुटुंबात गणेशाचे आगमन आनंदात झाले आहे. त्या सोबतच संपूर्ण शहराचा म्हणून एक गणेशोत्सव म्हणून एकाच ठिकाणी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पालखी सोहळा व शहरातील प्रमुख मार्गांवरील मिरवणुकीनंतर गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या गणेशोत्सवासाठी महिलांचे लेझीम पथक, या शहराच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे ढोल पथक, तरूणांचे झांजपथक, अबाल वृद्धांचा कार्यक्रमातील प्रोत्साहित करणारा सहभाग या गोष्टी उत्सवात आणखी एकोप्याचे आणि आनंदाचे रंग भरत आहेत.

उत्सवातील दहाही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, लहान मुलांसाठी चित्रकला, रंगभरण स्पर्धा, नृत्य स्पर्धा, तरूणांसाठी नृत्य स्पर्धा, आर्केस्ट्रा, फॅशन शो, गीतगायन स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असेलला विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व संपूर्ण शहराच्या आरोग्य-स्वास्थ या विषयावरील संवाद सत्र, ज्येष्ठ महिला नागरिकांचे भजनाचा कार्यक्रम, आध्यात्मिक, सामाजिक विषयावरील नृत्य सादरीकरण, भगवतगीतेवरील सत्संग, भजन संध्या असे अनेकविध कार्यक्रम सायंकाळच्या वेळी आयोजित केले जात आहेत. ज्यामध्ये आठ ते दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी होवून कार्यक्रमांचा आनंद घेतात.

मगरपट्टासिटी व नांदेडसिटीमधील नागरिकांचा समावेश असलेल्या विविध समिती या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करीत असून दोन्ही शहरांमधील पीएमएस (शहर व्यवस्थापन समिती) त्यास आवश्यक गोष्टींचे पाठबळ उपलब्ध करून देते आहे. कोरोना टाळेबंदीनंतर यंदा हा गणेशोत्सव अगदी मोठ्या प्रतिसादात साजरा होतो आहे हे या गणेशोत्सवाचे आणखी एक विशेष सांगता येईल.


