पुणे – काँग्रेसचे कोथरूड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ चे कार्यक्षम, धडाडीचे नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या वतीने कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १८ ते ४४ वयोगटातील गरजवंत महिलांसाठी स्वखर्चाने लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. घरेलू कामगारांसह कोथरूड परिसरातील सुमारे तीन हजार महिलांना या मोहिमेचा लाभ होईल. नगरसेवक स्तरावर राबविण्यात येणारी ही पुण्यातील सर्वात व्यापक मोहीम आहे. भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे.
novelty and best selling clothingया संदर्भात माहिती देताना कदम यांनी सांगितले की, माझ्या प्रभागामधील किष्किंधा नगर, सुतारदरा, जय भवानी नगर अशा वसाहतींमधील १८ ते ४४ वयोगटातील महिलांना या मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ होणार आहे. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून नोंदणीद्वारे लसीकरण करण्यात या महिलांना अनेक समस्या येत आहेत. त्यापैकी अनेकांकडे पुरेशी माहिती, कागदपत्रे नाहीत. परिणामी, या महिला मोठ्या संख्येने लसीकरणापासून दूर राहिल्या आहेत. आम्ही वेळोवेळी मागणी केल्यानंतर आता अखेर केंद्र सरकारने कोविन ॲपवर नोंदणी करण्याची सक्ती मागे घेतली आहे. परंतु, तरीही लस केंद्रांवर सावळा गोंधळ होऊन अनेक महिला लसीकरणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. म्हणूनच अशा महिलांची केवळ नोंदणी करण्यात मदत करण्याऐवजी संपूर्ण लसीकरण करण्याची जबाबदारीच घेण्याचे मी ठरवले. त्यासाठी आवश्यक तो निधी मी व्यक्तिगत स्तरावर उभा केला आहे, असेही ते म्हणाले.
ॲड. कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १९ ते २५ जून या कालावधीत ही लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क साधावा – ०२०-२५३८१२०१, ९६३७९३११११, ९६०७५१६५१६, ८३८०८०९०६४
लसीकरणाचा दुहेरी फायदा
या मोहिमेमुळे तीन हजारांहून अधिक महिलांचे विनासायास लसीकरण होऊ शकणार आहे. त्यामध्ये घरेलू कामगार महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असेल. त्याचा दुहेरी फायदा या परिसरातील मोठ्या सोसायट्या व तेथील कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने होणार आहे. या घरेलू कामगारांपैकी बहुतांश महिला या परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये घरेलू कामगार म्हणून काम करतात. त्यांचे लसीकरण होऊ शकत नसल्यामुळे संबंधित सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये काहीशी अस्वस्थता व भीती पसरली होती. तसेच या घरेलू कामगार महिलांना आपल्या रोजगारापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता या घरेलू कामगार महिलांचेही आता लसीकरण होणार असल्यामुळे बिनदिक्कतपणे त्या परिसरातील सोसायट्यांमध्ये कामासाठी जाऊ शकतील आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांना कोणताही धोका उद्भवणार नाही. पर्यायाने कोविड सुरक्षित वातावरण आणि घरेलू कामगार महिलांसाठी रोजगाराची हमी असे दुहेरी फायदे या मोहिमेच्या माध्यमातून साध्य करता येणार आहेत, असा विश्वास ॲड. चंदूशेठ कदम यांनी व्यक्त केला.
….