पुणे(प्रतिनिधि)–एससी आणि एसटी आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्याचबरोबर धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी घेतील अशी अपेक्षा होती, मात्र यावर ते काहीच बोलले नाहीत असा सवाल प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.
माजी नगरसेवक महेश वाबळे, रासपचे शहराध्यक्ष बालाजी पवार, कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, नितीन पंडित, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. कर्नाटकामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. त्यामुळे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची भाषा करत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे त्यांनी स्पष्ट करावे. राहूल गांधी यांनी रोहित वेमुलावरुन अनेक भाषणे केली. त्याच वेमुलाची फाईल बंद करण्यात आली आहे. काँग्रेस उघड हिंदू विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणार्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाला ही भुमिका मान्य आहे का? हे स्पष्ट करावे. 370 कलम पुन्हा आणू, ट्रिपल तलाक कायदा पुन्हा आणू, असे म्हणणार्या काँग्रेसची भूमिका ठाकरेंना मान्य आहे का ? ठाकरे हिंदुत्वाच्या पोकळ गप्पा मारतात.
रेवन्नाचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. एक वर्ष काँग्रेस सरकार या क्लिपवर शांत का होती? कारवाई का केली नाही. त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता. केवळ त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करायचे आहे का? असे सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केले.