पुणे–सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ पद्म विभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बंगाली साहित्य क्षेत्रातील प्रतिथयश संस्था कोलकाता स्थित ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
कलकत्ता येथे १९१८ मध्ये स्थापित, श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय आज देशातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ते केवळ ग्रंथालय नाही तर राष्ट्रीय वारसा पुढे नेणारी ही एक शैक्षणिक आणि साहित्यिक संस्था आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कोरोनाचे नियमांचे पालन करीत निमंत्रितांच्या उपस्थितीत पुण्यात भांडारकर संस्थेच्या सभागृहात येत्या गुरूवार, ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
समरसता गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर हे आभासी पद्धतीने सहभागी होवून या समारंभास संबोधित करतील. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रेमशंकर त्रिपाठी यांनी दिली.
डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान हा पुरस्कार ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ संस्थेने १९९० साली सुरू केला असून पुरस्काराचे यंदा ३१ वे वर्ष आहे. संस्थेतर्फ पहिला पुरस्कार डॉ. श्रीधर भास्कर वेर्णेकर यांना प्रदान करण्यात आला होता. तर गेल्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार, लेखक हृदय नारायण दीक्षित यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलेले होते.