सनई चौघडा अन् बॅन्डच्या मंगल सूरात मानाच्या पाचही गणपतींसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– सनई चौघडा अन् बॅन्डचे मंगल सूर, रांगोळ्यांसहीत मंदिरांत तसेच उत्सव मंडपात केलेल्या आकर्षक सजावटीत, मात्र साध्यापद्धतीने यंदाही मानाच्या पाचही गणपतींसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर (ता.१०) शुक्रवारी झाली. कोरोनाचे निर्बंध असल्याने मंडळांच्या परिसरात दरवर्षीची गर्दी आज नव्हती. मंडळाचे मोजके कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबिय इतकेच उपस्थित होते.

आनंदोत्सवात, प्रसन्ननेने गणेशभक्तांनी उत्साहात लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. शंखनाद, नगारावादन आणि बॅन्डच्या सूरावटीत वातावरणही मंगलमय झाले होते.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही गणेश मंडळांनी शासकीय नियमांचे पालन करीत समाजिक बांधिलकी जपली.शुक्रवारी (ता.१०) सकाळी दहा ते दूपारी दीड वाजेपर्यंत मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. याप्रसंगी मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. मानाच्या पाचही मंडळांनी शासनाच्या आवाहनानुसार श्रींच्या दर्शनाची सोय यंदाही ऑनलाइन केली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची गर्दी फारशी झाली नाही.

शासकीय नियमांचे पालन करून यंदाही पहिल्या दिवशीची श्रींच्या स्वागताची मिरवणूक काढण्यात आली नाही.

मानाचा पहिला – श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी खासदार गिरिश बापट यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी चांदीच्या पालखीतून प्रतिकात्मक पद्धतीने मंडपाच श्रींचे आगमन झाले. सनई चौघड्यात धार्मिक पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना साधेपणाने झाली. 

मानाचा दुसरा – श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी साडेअकरा वाजता,वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्‍वरी देवीच्या मंदिरातून श्रींची मूर्ती मोरया, मोरयाच्या जयघोषात उत्सव मंडपात आणली. बॅन्डच्या सूरावटीत आणि सनई चौघड्यांच्या मंगलसूरांत श्रींचे स्वागत करण्यात आले.

मानाचा तिसरा – श्री गुरुजी तालीम मंडळ

श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची दुपारी एक वाजता, उद्योगपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते झाली. यावेळी ढोलताशाच्या स्थिरवादनाने श्रींस मानवंदना देण्यात आली.

मानाचा चौथा गणपती -श्री तुळशीबाग सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट

श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता, बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते झाली.  उत्सवात यूट्यूबवर शिल्पकारांचा गणपती या मालिकेतून कलाकारांच्या मुलाखती व अनुभव कथन ऐकायला यंदा मिळणार आहे.

मानाचा पाचवा – श्री केसरी वाडा गणेशोत्सव

श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी अकरा वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते झाली. पारंपारिक लाकडी पालखीतून श्रींचे उत्सव मंडपात उत्साहात स्वागत करण्यात आले. सनई-चौघड्याचे स्वर अन्  पारंपारिक पद्धतीने गणरायाची धार्मिक विधीव्दारे प्रतिष्ठापना झाली.

दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, ‘श्रीं’चे दर्शन आणि ऋषिपंचमीनिमित्त होणारा अथर्वशीर्ष पठण सोहळा यंदा ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचीही स्थापना मुख्य मंदिरातच करण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

10 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तानं तब्बल 10 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यात या 10 किलो सोन्याच्या मुकुटाची चर्चा सुरू आहे. या सोन्याच्या मुकुटाची किंमत सुमारे 6 कोटी रुपये इतकी आहे. सोन्याचा मुकूट बाप्पाचरणी देणाऱ्याचं नाव मात्र मंदिर प्रशासनानं गुपित ठेवल आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *