पाटना(ऑनलाईन टीम)—बिहारच्या निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. भाजप-जेडीयुच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल यूनाइटेडचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत ‘जंगलराज’ या शब्दाचा अनेकदा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी तर भाषणामध्ये आपल्या नेहेमीच्या शैलीत तेजस्वी यादव यांचे नाव न घेता जनतेला संबोधताना ‘जंगलराज के युवराज से अलर्ट रहेना है’, असे आवाहन बिहारी जनतेला केले. कदाचित त्याचाही मतदारांवर परिणाम झाला असेल. परंतु, मोदींच्या आणि नितीशकुमार यांच्या ‘जंगलराज’ या शब्दप्रयोगाची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सुरु आहे. बिहारमध्ये हजारो- लाखोवेळा केलेला हा शब्दप्रयोग नेमका कुठून आला? आणि कोणी पहिल्यांदा हा शब्दप्रयोग केला हे समजून घेणे आवश्यक आहे.
लोकांना माहित आहे की जंगलराज हा शब्द बिहारचा समानार्थी शब्द का झाला. परंतु, त्यांच्या मनात अजूनही प्रश्न आहे की जंगलराज हा शब्द कधी वापरला गेला? पाटणा उच्च न्यायालयात 5 ऑगस्ट 1997 रोजी एका याचिकेवर सुनावणी सुरु असताना त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सहाय यांची याचिका न्यायमूर्ती व्ही.पी. आनंद आणि न्यायमूर्ती धर्मपाल सिन्हा यांच्या खंडपीठासमोर मांडली गेली, ज्यात त्यांनी बिहारमधील परिस्थितीचा उल्लेख केला. त्यावेळी पाटणा उच्च न्यायालय म्हणाले होते, ‘बिहारमध्ये सरकार नाही तर भ्रष्टाचारी अधिकारी येथे राज्य चालवत आहेत आणि बिहारमध्ये जंगलराज झाले आहे. वस्तुतः पटना उच्च न्यायालयाने जंगलराज हा शब्दप्रयोग बिहारसाठी प्रथम वापरला होता, त्यानंतर हा शब्द सामान्य झाला आणि लालूप्रसाद आणि राबडी देवी यांच्यासाठी राजकारणात वापरला जाऊ लागला.
बिहारमध्ये कशामुळे आले जंगलराज
बिहारच्या जुन्या लोकांच्या मनात जंगराजच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. 1990 ते 2005 पर्यंत असे एकूण 15 वर्षे बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाने राज्य केले. त्या काळात राज्यात गुन्हेगारीचे वर्चस्व होते. बिहारमध्ये अपहरणासारख्या गुन्ह्याला उद्योगाचा दर्जा मिळाला. अपहरणानंतर बिहारमध्ये खंडणीची मागणी सर्रास केली जात होती. तर, अनेकदा खंडणी मिळाल्यानंतरही निष्पाप लोकांना ठार मारण्यात येत होते. अशा प्रकारच्या बिहारमध्ये दररोज घडत असत आणि राज्यातील रस्त्यावर पाण्यासारखे रक्त वाहत असे.चोरी आणि दरोडेखोरी तर बिहारमध्ये अगदी सामान्य झाली होती.
साहब-बीवी और गैंगस्टर
बिहारमध्ये 15 वर्षे लालू कुटुंबाच्या राजवटीला ‘साहब-बीवी और गैंगस्टर’ म्हणूनही ओळखले जाते. वास्तविक, लालू प्रसाद यादव यांचा उदय बिहारमधील दिग्गज नेते कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर झाला. यासह बिहारमधील गुन्ह्यांचा आलेखही खूप वेगात वाढला. या काळात राज्यात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हे सर्व साधू यादव आणि सुभाष यादव यांच्या आदेशानुसार लालूंच्या काळात झाले. दरम्यान, राज्यात भ्रष्टाचारही लक्षणीय वाढला होता. चारा घोटाळ्यात लालूंना खुर्ची सोडावी लागली आणि त्यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर राबडीदेवी यांनी केलेल्या विधानाची आजही चर्चा होते. राबडी देवी त्यावेळी होत्या की, ‘साहेबांना इच्छा होती म्हणून मी मुख्यमंत्री आहे ज्याप्रमाणे आतापर्यत घर सांभाळले तसे आता राज्य चालविल.’