टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज (गुरुवारी) देहूमधून प्रस्थान झाले.

देहुमध्ये दुपारी अडीच्या सुमारास पालखी पंढरपूरला जाण्यासाठी औपचारिक प्रस्थान ठेवले. 100 वारकर्‍यांच्या उपस्थितीत परंपरा जतन करीत मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा झाला. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे 336 वे वर्ष आहे. वारकर्‍यांनी केलेल्या ’ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने अवघा देऊळवाडा तल्लीन होऊन गेला होता.

दरम्यान, तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो वैष्णव गर्दी करतात. त्यामुळे इंद्रायणीकाठ फुलून जातो. परंतु, यंदा कोरोनामुळे इंद्रायणीचा काठ आणि देहू परिसर सुना-सुना वाटत होता. कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी पालखी सोहळा साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप सुरू असून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाही आषाढी पायी वारी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गेल्या अनेक वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संत तुकाराम महाराज संस्थानने 100 वारकर्‍यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळ्याचे नियोजन केले. पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे चारपासून सुरू झाले. पहाटे चार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे यांच्याहस्ते काकडा आरती व अभिषेक महापूजा करण्यात आली. राम मंदिरातील महापूजा विश्वस्त विशाल महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. वैकुंठगमण मंदिरातील महापूजा अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी 10 ते 12 या वेळेत पालखी प्रस्थान सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे सांगता समारंभाचे किर्तन झाले. किर्तन संपल्यानंतर सेवेकरी सुनील सोळंके, गंगा मसलेकर हे पादुका घेऊन संबळ, टाळमृदंग गजर आणि तुतार्‍या वाद्यांसह मुख्य मंदिरातील भजनी मंडपात दाखल झाले. दुपारी अडीचच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्नीक पुजा केली. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे उपस्थित होते.

पुंडलिकवरदा हरी विठ्ठलचा जयघोष करीत पादुकांचे प्रस्थान झाले. देऊळवाड्यातील मंदिर प्रदक्षिणा झाली. वारकर्‍यांनी टाळमृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला. खांद्यावर गरुडटक्के, चोपदार होते. देऊळवाड्यातील प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पादुका भजनी मंडपात विराजमान करण्यात आल्या. 1 ते 19 जुलैपर्यंत वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहेत. या कालावधीत देऊळवाड्यात मोजक्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. 19 जुलैला देऊळवाड्यातून एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.

पोलिसांचा होता बंदोबस्त, सीमा होत्या बंद

देहूगावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. गावात संचारबंदी लावण्यात आली होती. सर्व सीमा बंद केल्या होत्या. वाहतूक बाह्यवळणमार्गाने वळविण्यात आली. स्थानिकांना सोडून इतर वाहनांना व भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. पास धारक वारकरी, त्यांच्या वाहनांना प्रवेश दिला जात होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *