लतादीदींचा सेवाभाव जपणे हीच संगीत हिमालयास श्रद्धांजली-सरसंघचालक मोहन भागवत

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे – मनातील लतादीदींच्या विषयी भावनांना शब्द फुटत नाहीत.  भारतवर्षात सर्वांना तणावमुक्त करणारा स्वर हरपला आहे. लतादिदी यांच्या वैयक्तिक जीवनातील शुचिता, प्रशासन खडतर तपस्या आणि करुणा यासारखे गुण आपण आपल्या जीवनात अंगीकारायला हवे. हीच संगीत हिमालयास खरी श्रद्धांजली ठरेल असे मत रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी सरसंघचालक डॉ. भागवत बोलत होते. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित या सभेसाठी लतादिदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी देश विदेशातून  त्यांचे चाहते आले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर, मीना खाडीकर, आदिनाथ मंगेशकर हे मंगेशकर कुटुंबीय तसेच विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,  विश्वशांती विद्यापीठाचे संचालक डॉ. विश्वनाथ कराड, संगीत दिग्दर्शक  रूपकुमार राठोड  आदि यावेळी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की,  दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे दिदींचे माहिती असलेले कार्य आहे. परंतु त्याशिवाय दादरा नगर हवेली मुक्तीसाठी सहकाऱ्यासोबतच अनेक सेवा दिदींनी दिल्या आहेत. त्या सर्व आपल्याला ज्ञात नाहीत. जीवनातील अलौकिक तत्त्व विविध रूपाने आपल्याला भेटायला येतात. आपली साधना पूर्ण करून जातात. त्यांचा स्वर चिरंतन आहे. त्यांच्या भेटीत असीम शांतता अनुभवली आहे. जीवनातील सत्य परिस्थिती त्यांनी स्वीकारली. आपल्या वडिलांना उपचार मिळाले नाहीत हे स्मरणात ठेऊन समाजाला असे भोगावे लागू नये यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या सेवाभावाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन शक्य नाही. दिदींचा स्वर आपल्या सोबत चिरंतन राहील. दिदींच्या व्यक्तिगत जीवनातील शुचिता, प्रशासन, करूणा, सेवाभाव  यांचा आपण आपल्या जीवनात अंगीकार करून आचरण करुया हीच संगीत हिमालयाला खरी श्रद्धांजली ठरेल,  असेही ते म्हणाले.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, आता माझ्या आयुष्यात केवळ अंधार आहे. मला ८० वर्षांच्या सहवासातसुद्धा दिदी समजली नाही. जगात दोन माऊली झाल्या एक आळंदीला संत ज्ञानेश्वर आणि दुसरी माझी दिदी. सद्गदित होत त्यांनी कुसुमाग्रज यांच्या मला वाटले विश्व अंधारले या पृथ्वीचे प्रेमगीत मधील कविता यावेळी सादर केली.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दिदी गेल्यावर आमचे बाबा पुन्हा गेले आता आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झाले आहोत. असे सांगत कातर स्वरात दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भावनाविवश मनोगताने संपूर्ण सभागृह गहिवरले.

यावेळी डॉ. विश्वनाथ कराड आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनीही मनोगते व्यक्त केली.

दिनानाथ रुग्णालयाचे  वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रास्ताविक केले. गायिका विभावरी जोशी यांनी सादर केलेल्या कविवर्य वसंत बापट यांच्या गगन सदन या प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *