लाखो वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल : रांगोळ्या, फुलांच्या उधळणीत पालख्यांचे स्वागत

Lakhs of Vaishnavs entered Pune
Lakhs of Vaishnavs entered Pune

पुणे(प्रतिनिधि)–टाळ, चिपळ्यांचा घणघणाट, मनामनात भक्ती रस निर्माण करणारा मृंदगनाद, अभंगावर  डोलणारे वारकरी, हवेत फडफडणार्‍या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदनाचा टिळा, गळा तुळशी माळा आणि मुखी ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष असे भक्तीमय वातावरण. पालखी मार्गावरील रांगोळ्यांच्या पायघड्या, चौकाचौकांत साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळी, रस्त्यांच्या दुतर्फा स्वागत करणारे बॅनर, फलेक्स आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविलेले पालख्यांचे रथ दृष्टीपथास पडताच पुणेकरांनी मनोभावे घेतलेले दर्शन अशा प्रसन्न व उत्साही वातावरणात रविवारी पुण्यनगरीत लाखो वैष्णवांचा मेळा दाखल झाला.

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे वैष्णवांच्या मेळ्यासह आगमन झाले. वैष्णवांचा महासागर आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या गजराने अवघे शहर दुमदुमले. पालख्या दृष्टीपथात पडताच पुणेकर मनोभावे हात जोडून कृतार्थ झाले. सकाळपासूनच पुणेकरांनी पालखी दर्शनाची आस लागली होती. त्यामुळे पालखी मार्गासह संपूर्ण शहरात स्वागताची लगबग सुरू होती. दुपारी देहू वारकरी शहरात येणार्‍या सुरूवात झाली. आणि पुणेकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पालखी मार्गावर पुणेकर वारकर्‍यांच्या सेवेत रमले.

अधिक वाचा  पुण्यात रंगणार दृष्टीहिनांसाठीची राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा

पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकर दरवर्षी आतूर असतात. यंदाही पालखी दर्शनाची ओढ पुणेकरांना लागली होती. संतांच्या पालख्या डोळ्यात साठविण्यासाठी पालखी मार्गावर पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे, यंदाही दोन्ही पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली. पाटील इस्टेट चौकात पालख्यांचे आगमन होताच पुणेकरांनी पुष्पवृष्टी करीत मोठ्या भक्‍तिभावाने पालख्यांचे स्वागत केले. या वेळी जमलेल्या भक्तांनी तसेच वारकर्‍यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या नामाचा जयघोष केला. या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.

शहरात सकाळ पासूनच ऊन पावसाचा खेळ सुरू होता. दुपार नंतर पाऊस थांबला. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर थकवा जाणवत होता. मात्र, उत्साह कायम होता. तुकोबांची पालखी पिंपरीहून, तर माऊलींची पालखी आळंदीतील गांधी वाड्यातून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. वारकरी टाळ-मृदंगांच्या घणघणाटासह अभंगांच्या तालावर आनंदाने नाचू-डोलू लागले. त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.

अधिक वाचा  खडकवासला १०० टक्के भरले : धरणाच्या सांडव्यातून ११ हजार ९०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

सायंकाळी ५.५ वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ पाटील इस्टेट चौकात पुणेकरांच्या दृष्टिपथास पडला. तुकोबांची पालखी आणि रथातील पादुका दिसताच भाविक कृतकृत्य झाले. काहींना पादुका दर्शनाचे भाग्य लाभले. तुकोबांच्या आगमनानंतर माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भक्तांना सुमारे पावने दोन तास वाट पाहावी लागली. सायंकाळी ६.५० वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली प्रकटले अन् भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माऊलींच्या पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुंबड उडाली. पादुकांचे दर्शन काहींनाच प्राप्त झाले. मात्र, धन्यत्वाचा अनुभव सर्वांनीच घेतला.

पाटील इस्टेट चौकात तुकोबा व ज्ञानेश्‍वर माऊलींच्या रथावर फुलांची उधळण करण्यात आली. वारकर्‍यांचा हा भक्‍तिप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्ता मार्गे ज्ञानेश्‍वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक येथे विसावला. तेथे ज्ञानोबा-तुकारामचा एकच गजर झाला. पालख्यांच्या दर्शनासाठी पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी वारकर्‍यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे वारकर्‍यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. टिळक चौकातही पालख्यांचे स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. संपूर्ण पालखी मार्गावर पुणेकर वारकर्‍यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे; तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे रात्री उशिरा विसावली.

अधिक वाचा  चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेक :हिंमत असेल तर समोर या-चंद्रकांत पाटलांचं आव्हान

…त्या मुलांची दिंडी ठरले आकर्षण

दरवर्षी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले दिंडीत सहभागी होत असतात. यंदाही पालखी सोहळ्यात या मुलांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘आत्महत्या करू नका’ असा हातात फलक घेवून संदेश देत ही मुले चालत होती. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या दिंडीने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील मुलांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर माऊलीच्या नावाचा जयघोष करत. शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका, असा संदेशही दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love