◆ ग्राहकपंथीयांची अग्निपरीक्षा! ◆

लेख
Spread the love

◆ “आजच्या घटकेला जन्मलेलं मूल व मृत झालेली व्यक्ती हे ग्राहक आहेत, रस्त्यावरचा भिकारी व देशाचे पंतप्रधान हे सुध्दा ग्राहक आहेत,” असे मानणारा हा ग्राहकपंथ आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापककै. बिंदूमाधव जोशी यांनी आपल्या सखोल चिंतनातून मांडलेले तत्वज्ञान एकप्रकारे ग्राहक पंथीयांसाठी ‘अमृतवचन’ आहे. 15 मार्च, जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत या संघटनेच्या तत्वज्ञानाची करुन दिलेली थोडक्यात ओळख..

◆ ग्राहक वर्गासाठी विशेष आस्था बाळगणारा वैशिष्ट्यपूर्ण असा हा शिस्तबध्द ग्राहकमंच आहे. “शोषित पीडित ग्राहक जन भाग्य जगानेवाले हम” असे ग्राहक गीत गाणारा हा ग्राहकपंथ आहे. प्रपंच करण्यात सतत अडचणी असतानांही “प्रपंच करावा नेटका” असा सकारात्मक संदेश देणारा हा ग्राहकपंथ आहे.भारत माता का सुख गौरव प्राणो से भी प्यारा है। युग युग से मानव हित करना, शाश्वत धर्म हमारा है।असा नारा देणारा ग्राहकपंथ आहे.

◆ ग्राहकपंथीयाचे ब्रीदआजच्या घटकेला जन्मलेलं मूल व मृत झालेली व्यक्तीु हे ग्राहक आहेत, रस्त्यावरचा भिकारी व देशाचे पंतप्रधान हे सुध्दा ग्राहक आहेत असे मानणारा हा ग्राहकपंथ आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक, ग्राहकतीर्थ कै. बिंदूमाधव जोशी यांच्या ग्राहक साधनेतून निर्माण झालेले विश्वतव्यापक तत्वज्ञान हे एक प्रकारे ग्राहक पंथीयांसाठी ‘अमृत – वचन’ आहे.

◆ ग्राहकपंथीयांचा सिद्धांत1) शोषणमुक्त अर्थव्यवस्थेसाठी मुळाधार, शोषणरहित, दक्ष, ग्राहकांचे संघटन2) धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चार पुरूषार्थाच्या आधारावर समाज रचना3) ‘ग्राहक’ हा शब्द ‘उपभोक्ता’ या शब्दापेक्षा अधिक अर्थपूर्ण व व्यापक आहे. जो केवळ खरेदी करून उपभोग घेतो तो उपभोक्ता म्हणून ओळखला जातो. परंतु मन – शरीर – बुद्धी व आत्म्याने ते जो ग्रहण करतो तो ग्राहक आहे.4) अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा उद्देश उत्पादक, व्यापारी, कर्मचारी, शेतकरी, ग्राहक या सर्वामध्ये समन्वय स्थापन करण्याचा आहे. याला ग्राहक पंचायत ‘अर्थ पंचक’ मानते.5) अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे समाजाच्या आर्थिक समरसतेचे अभियान आहे.6) वैभवसंपन्न समाजासाठी वैभवसंपन्न – परिवार, वैभवसंपन्न – गृहस्थाश्रम अर्थात या आधारावर स्थिर व सुखी परिवार व्यवस्था.7) भोगवाद आधारित समाजरचना बदलून मूल्याधिष्ठित समाजाची रचना.8) कृषीवर आधारित स्वदेशीच्या ताकदीवर, ग्राहकाभिमूख समाजरचना हे मुख्य लक्ष आहे.9) अर्थशास्त्राच्या सर्व चिंतनाच्या केंद्रस्थानी उत्पादक नाही, तर ग्राहक असला पाहिजे. दक्ष ग्राहकाच्या नियंत्रणात असलेली समाजरचना ही काळाची गरज असून अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे.

◆ ग्राहक पंथीयांची जीवनशैलीसमाजातील तळागाळापर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक हिताचा, उदात्त विचारांचा प्रसार करणे, आपण आणि आपल्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीं मध्ये परस्परांना समजून घेणे. विसंवादाऐवजी ‘सुसंवाद’ निर्माण करणे, समाजातील शोषित घटकांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी स्वयंनिष्ठ, आत्मनिष्ठ, आत्मनिर्भर, सज्जनशक्तीची फौज निर्माण करणे.

◆ सविनय कायदे पालन -शासन व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून व त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘सविनय कायदे पालन’ ही ग्राहक पंथीयांसाठी प्रमुख अट आहे. ‘ग्राहक पंथीयांना जरी गरम पाण्यात उभे केले, डोक्यावर जरी बर्फ ठेवला तरी, ग्राहक पंथीयांच्या जीभेवर खडीसाखरच असली पाहिजे,’ हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा कडक दंडक आहे. ग्राहकपंथी आपल्या आचरणातून, वाणीतून, सुपरिचित असला पाहिजे. मानपान, अभिमान इ. मनाची वस्त्रे बाजूला सारुन सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवून सविनय कायदे पालनासाठी ग्राहक पंथीय आग्रही असला पाहिजे.
◆ रचनात्मक संघर्ष -चळवळी कुठल्याही असोत संघर्ष करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीस “संघर्ष, तर पाचवीला पुजलेला आहे. संघर्ष संघटनेतील चैतन्य असते. रचनात्मक संघर्ष हे ग्राहक पंचायतीचे वैशिष्ट्य आहे. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हा ग्राहक पंथीयांसाठी मूलमंत्र आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने अत्यंत अभ्यासपूर्वक, रचनात्मक संघर्षाद्वारे ‘ग्राहक संरक्षण कायदा’ आपल्या देशात निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आजच्या घडीला ग्राहक संरक्षण कायदा सामाजिक बांधिलकी जपणारा एक सुंदर कायदा म्हणून जगभरात ओळखला जातो. हा कायदा म्हणजे समस्त देशवासीयांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून मिळालेली एक अपूर्व देणगी आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये या कायद्याने कात टाकली आहे. “ग्राहक संरक्षण कायदा २०१५” अधिक सक्षम स्वरूपात अस्तित्वात आला आहे. शोषण करणाऱ्यांना जरब बसावी अशा तरतूदी या नवीन कायद्यात समाविष्ट करण्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत यशस्वी ठरली आहे. ग्राहक पंथीयांनी रचनात्मक संघर्षाद्वारे प्राप्त केलेली ही विजयी पताका आहे.

◆ कोरोना ( कोव्हिड – १९)कोरोना महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. भारतीय समाज शिस्तपालनाच्या जोरावर या संकटावर मात करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीवर भारतीय समाजाला सकारात्मक व योग्य असे मार्गदर्शन करण्याचीजबाबदारी साहजिकच ग्राहक पंथीयांवर आहे. टाळेबंदीच्या काळात मॉल, चित्रपटगृहे, उपहारगृहे इ. बंद असल्याने कोणाचे काही अडले नाही किंवा बिघडले नाही हे त्रिवार सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. बळजबरीने का होईना पण हे एकप्रकारे यशस्वीरित्या उपभोगावर संयम ठेवल्याचे प्रतिकच आहे.

◆ उपभोगावर संयमआजच्या विदारक परिस्थितीचे काकदृष्टीने अवलोकन केल्यास भारतीय समाजमन भरकटत चालले आहे, हे प्रामुख्याने लक्षात येते. पाश्चात्य संस्कृतीने आपल्या विविधअंगी विपणन (मार्केटिंग) शास्त्राच्या आधारे भारतीय समाजाला व विशेषत: तरूण पिढीला लक्ष्य करून वस्तू संस्कृतीचा भडीमार करत कब्जा मिळवला आहे. हे तर आपल्या भोळयाभाबडया समाजास संमोहित (Hypnotise) करण्याचे षडयंत्र आहे. जाहिरातबाजी नामक विषारी विषाणूद्वारे भारतीय समाज पोखरुन टाकण्यात पाश्चात्य शक्ती् यशस्वी ठरली आहे. अशा बिकट प्रसंगी ‘उपभोगावर संयम’ नामक ब्रम्हास्त्राचा प्रयोग करण्याशिवाय पर्याय नाही.

◆ कै. बिंदूमाधव जोशी उर्फ नानांनी आधीच काळाची पावले अचूक ओळखून, दूरदृष्टीकोनातून उपभोगावर संयम हा कानमंत्र अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून समस्त ग्राहक पंथीयांना यापूर्वीच दिला आहे.प्राप्त परिस्थितीत उपभोगावर संयम हा कानमंत्र समाजातील तळागाळापर्यंत पोहचविणे ही आजच्याघडीला ग्राहक पंथीयांची अग्निपरीक्षा आहे. कोरोना ( कोव्हिड – 19) या महामारीमुळे उदभवलेल्या विचित्र कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी व देशाचे ढासळलेले अर्थचक्र सावरण्यासाठी सज्ज होऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या विजयशाली संघटित कार्यशक्ती द्वारे उपभोगावर संयम हा क्रांतीकारक विचार समस्त भारतीय समाज मनावर संस्कारित करण्यासाठी कार्यरत होण्याची गरज आहे.

◆ श्रीकांत जोशी ◆ (लेखक अ. भा. ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मध्य महाराष्ट्र प्रांत ग्राहक न्याय समितीचे प्रमुख आहेत.)

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *