मुंबई – राज्यातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आजची राज्याची परिस्थिती पाहता राज्यात आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये असे वाटत असेल तर लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 14 दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ऑनलाईन झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, महिन्याभराच्या आत आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला हवं. एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे.लोकांचं येणे जाणे कमी करणे हा उद्देश आहे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचे नियोजन करा. ‘पीक अवर’ ही संकल्पना आता बदलायला हवी.निवडणूक आणि लग्न सराई सुरू झाली. यामुळे 25 वर्षावरील मुलं सुद्धा संक्रमित होत आहे. 45 वयावरील लोकांप्रमाणेच, आता 25 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांनाही लस देण्याची केंद्राकडे विनंती त्यांनी केली.
रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं रोखठोक मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं