पुणे- काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यशासनाने या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करुन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गायकवाड म्हणाले, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. सध्या मराठा समाजाला लागू केलेले SEBC आरक्षण सुप्रीम कोर्टात अडकले असल्याने त्याचा निर्णय यायला किती वेळ लागेल याबाबत अनिश्चितता आहे. SEBC आरक्षणाला स्थगिती असल्याने सद्यस्थितीत मराठा समाज खुल्या वर्गातच ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना असणाऱ्या EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तो नैसर्गिकरित्या पात्र आहे. परंतु राज्य शासनाने मराठा समाजाला अद्याप EWS लागू केले नसल्याने जागोजागचे तहसीलदार, प्रांतअधिकारी मराठा समाजातील युवक युवतींना असे EWS प्रमाणपत्र देत नसल्याच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे,न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करुन त्यांना न्याय द्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल आणि त्यामध्ये होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला.