चंद्रपूर(ऑनलाईन टीम)— कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन संस्था चालवणाऱ्या डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी कौटुंबिक वादातूनच आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांचा मृत्यू आत्महत्या करूनच झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती.
डॉ. शीतल यांचे त्यांचे थोरले बंधू कौस्तुभ याच्याशी तीव्र मतभेद होते. डॉ. शीतल यांनी त्यांच्यावर अनियमिततेचे आरोप केले होते. कौस्तुभ यांनी पाच वर्षांपूर्वी विश्वस्त निधीचा राजीनामा देऊन आनंदवन सोडले होते. त्यानंतर त्यांचे वडील डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांची समजूत काढून पुन्हा आनंदवनचे काम सुरु ठेवण्यास राजी केले होते.
डॉ. शीतल आणि त्यांचे पती गौतम करजगी यांनी त्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यांनी प्रकाश आमटे, त्यांचे पुत्र अनिकेत आमटे आणि अन्य सहा जणांवर गंभीर आरोप करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला होता परंतु नंतर तो काढून टाकण्यात आला.
कौस्तुभ यांच्या राजीनाम्यानंतर त्या संस्थेतील काही जुन्याजाणत्या लोकांनाही संस्थेचा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे संस्थेचे व्यावसायीकरण झाल्याचे आरोप झाले. परंतु हे आरोप त्यांनी नाकारले. संस्था जगवायची असेल तर हे ब्दाल्कारणे अनिवार्य आहे, हे बदल म्हणजे व्यावसायीकरण नाही असे डॉ. शीतल यांचे म्हणणे होते. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा हस्तक्षेपाचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला होता.
दरम्यान. डॉ. शीतल यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं.
शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचं या चौघांनी म्हटलं होतं. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होता. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले होते.
मात्र, रविवारी एका पत्रकाराला व्हॉट्स एॅपवर त्यांनी मेसेज पाठवून मतभेद संपल्याचे सांगितले होते. तर कौस्तुभ यांना आनंदवनमध्ये घेऊन त्याच्याकडे सोमनाथ प्रकल्प सोपवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले होते. डॉ. प्रकाश आमटे यांनीही डॉ. शीतल यांच्या मृत्यूने धक्का बसल्याचे सांगितले. रविवारी गौतमशी बोलणे झाले होते. तोडगा काढल्याबद्दल त्यांनी माझे आभारही मानले होते. त्यानंतर काही तासात काय झाले मला माहिती नाही असे प्रकाश आमटे यांनी सांगितल्याचे दैनिक प्रभातने म्हटले आहे.