पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे गाव, शहर, धर्म, प्रांत, जातीच्या चौकटीत न सामावणारे राजे आहेत. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्त्वाची व्याप्ती अथांग आहे. म्हणून ते जात, धर्म, प्रांताच्या पलीकडे जावून विश्वव्यापी ठरतात. असे गौरवोद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी काढले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे बाबासाहेब पुरंदरे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजीत तांबडे, उद्योजक जगदिश कदम उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. आज देशाला राष्ट्रीय विचाराची नितांत गरज आहे. शिवरायांचे राष्ट्रीयत्व स्थायीभाव झाला पाहिजे. इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास हा कधीच जुना नसतो, तर तो नेहमीच ताजा असतो. शिवराय समजून घेण्यासाठी खुप अभ्यास केला. त्यातूनच मला त्यांच्या राष्ट्रीय विचारांचे टॉनिक मिळाले. आजपर्यंतच्या आयुष्यात अगणित लोकांचे प्रेम मिळाले. त्यामुळे माझ्या आयुष्यातील माणसे ही खरी मिळकत असल्याचेही पुरंदरे यांनी नमूद केले.
आजपर्यंत शिवरायांच्या कार्यासंदर्भात जे जे लिखान झाले आहे. त्या सर्व लिखानाचा वापर वर्तमान कालीन व्हायला हवा. परदेशातील लोक महापुरूषाविषयी आदर बाळगून आहेत. मुळात आदराची भावना रक्तात असायला हवी. छत्रपती शिवरायांसंदर्भात वेगवेगळ्या पातळीवर संशोधन होत आहे. संशोधनासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो. याचे भान नवलेखकांनी बाळगले पाहिजे. शिवसृष्टी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे बाहेरदेशातील स्मारके व वस्तुसंग्रहालये बघून माणूस धक्क होतो. शिवसृष्टीतून नव्या पिढीला छत्रपती कळले पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्याकडे डोंगरी, किनारी, सागरी, भुईकोट असे 352 किल्ले आहेत. त्यातील 292 किल्ले मी पाहिले आहेत. आज किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. मात्र संवर्धनासाठी जे करता येईल, ते केले पाहिजे, असेही पुरंदरे यांनी स्पष्ट केले.
मी तर सर्वसामान्यच
शिवकार्यासाठी मला आणखी काही वर्षे आयुष्य हवे आहे. मात्र म्हातारपण आणि आजारपणामुळे हे कार्य आणखी किती पुढे नेता येईल, हे सांगता येणार नाही. माझे जीवन वेगळे नाही. सर्वसामान्यांसारखेच मी ही जीवन गजलो आहे. माझे आई-वडिलही सामान्य होते. माझ्या वागण्याकडे वडिलांचे लक्ष होते. आईने कधी मारल्याचे आठवत नाही. माझी आई म्हणजे संस्काराची शिदोरी होती. त्यामुळे माझे आई-वडिल आणि माझ्यावर प्रेम करणार्या लोकांना मी कधीच विसरू शकणार नसल्याचेही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी स्पष्ट केले.