रॅम्बो सर्कसचा वाढदिवस साजरा:सर्कसचा मुक्काम फेब्रुवारी अखेर पर्यंत सिंहगड रोड येथे-रोज दोन शो


पुणे -भारतीय सर्कस सध्या आर्थिक अडचणीतून जात असून करोना संकटामुळे त्यात भर पडली आहे. गेली दीड वर्षे करोना परिस्थितीमुळे सर्कसचे प्रयोग बंद होते. आता प्रेक्षकांची निम्मी क्षमता नियमानुसार ठेवण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने सर्कस उद्योगाला करोनाकाळानिमित्त वार्षिक आर्थिक मदत देण्याचे मान्य केले या बद्दल आम्ही आभारी आहोत, अशा भावना रॅम्बो सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप यांनी व्यक्त केल्या.

रॅम्बो सर्कस ही पुण्याची सर्कस असून ३१ वर्षांपूर्वी २६ जानेवारी १९९१ रोजी प्रजासत्ताक दिन निमित्त पी. टी. दिलीप यांनी रॅम्बो सर्कस सुरु केली. रॅम्बो सर्कसचा ३१वा वाढदिवस आज सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक बस स्टँड समोर, फन टाईम मल्टिप्लेक्सच्या मागे चालू असणाऱ्या रॅम्बो सर्कस मध्ये साजरा केला गेला. प्रारंभी भारतीय सर्कसचे संस्थापक विष्णुपंत छत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विदुषकांच्या हस्ते व सर्कस कलावंतांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात केक कापण्यात आला. या प्रसंगी सर्व सर्कस कलावंत व विदुषकांनी हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन सर्कस मध्ये ‘भारत माता कि जय’, ‘सर्कस चिरायू हो’ अशा घोषणा देत सर्कस बँड सह फेरी मारली.

अधिक वाचा  हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात रंगले 'बॅनर वॉर' : हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?

प्रारंभी ‘सर्कस विश्व’ आणि ‘वर्ल्ड ऑफ सर्कस’ या पुस्तकांचे लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘सर्कस ही कला  जिवंत राहिली पाहिजे व त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये मध्यवर्ती भागात नाममात्र दरात मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत  तसेच पुण्यात सर्कस म्युझियम ही साकारले जावे’ असे ते म्हणाले. सर्कस कलावंतांतर्फे विदुषक विजू यांनी सर्वांना धन्यवाद देऊन ‘सर्कसचा वाढदिवस म्हणजे आम्हा प्रत्येक सर्कस कलावंतांचा वाढदिवस आहे’ असा सांगून या वाढदिवस निमित्त आलेल्या सर्वांना धन्यवाद दिले. सर्कस मित्रमंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सर्कसमध्ये प्राण्यांना परवानगी मिळावी अशी मागणी केली. सर्कस मित्रमंडळाचे सचिव प्रवीण तरवडे यांनी सर्कस कलावंतांना शासनाने पेन्शनची व्यवस्था करावी अशी मागणी केली. शासनाने २६ नोव्हेंबर हा भारतीय सर्कसचा जन्मदिवस अधिकृतपणे साजरा करावा असे एॅड आनंद धोत्रे म्हणाले. रॅम्बो सर्कसचे पुणेकरांशी भावनिक नाते असून दरवर्षी या सर्कसमध्ये एड्स ग्रस्त मुले, अनाथ व अपंग मुले यांना मोफत सर्कस दाखवली जाते याबद्दल पुणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अधिक वाचा  रेस कोर्स मैदानावर मोदींची महाविजय संकल्प सभा : २ लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार

या प्रसंगी नंदकुमार बानगुडे, सागर आरोळे, श्रुति तिवारी, वाजिद भाई आदी मान्यवर उपस्थित होते. श्रुति तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. राजू मॅनेजर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सर्कस रिंगमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपस्थितीत प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्वांना मास्क वापरणे सक्तीचे केले होते. तसेच सर्कस तंबूत जाताना सॅनिटायझरचा वापर होत होता.

रॅम्बो सर्कसचे रोज दुपारी ३.३० आणि सांयकाळी ६.३० असे दोन शो होतात. तिकिट दर १५० रु, २५० रु, ३५० रु व ५०० रु असून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. सर्कसमध्ये ६० कलावंत असून ७०० प्रेक्षक क्षमता आहे. सध्याच्या नियमानुसार ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जातो. सर्कसमध्ये फ्लायिंग ट्रापिज, डबल बॉलन्स, कॉमिक जगलिंग, लॅडर बॉलन्स, नावाव पट्टी, कॅनडाल, रोला बोला, बेबी रोप, वाटर शो, स्टिक बॉलन्स, क्यूब, डॉग शो, रिंग डान्स, क्लाऊन, लॅशो, गारमन वेल्स, एरियाल, सायकल स्पेशल, सायकल एक्रोबॅट्स, रिंग ऑफ डेथ आणि फिनाले इत्यादी मनोरंजक खेळ व कसरती सादर केल्या जातात. सर्कसचा मुक्काम फेब्रुवारी अखेर पर्यंत सिंहगड रोड येथे असणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love