पुण्यातील बावधन गावात हेलिकॉप्टर कोसळले : तिघांचा जागीच मृत्यू : तटकरेंना घेण्यासाठी मुंबई जुहूच्या दिशेने निघाले होते हेलिकॉप्टर

पुण्यातील बावधन गावात हेलिकॉप्टर कोसळले : तिघांचा जागीच मृत्यू
पुण्यातील बावधन गावात हेलिकॉप्टर कोसळले : तिघांचा जागीच मृत्यू

पुणे(प्रतिनिधि)—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबई जुहूच्या दिशेने निघालेले हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक गावात बुधवारी कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्याप्रमाणावर धुके होते. त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

ऑगस्टा १०९ असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे.  राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशी माहिती आहे.

अधिक वाचा  भावना आणि विचार यांची हार्मनी साधणे महत्त्वाचे-ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे 

सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे

हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने पेट घेतला होता. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते. उड्डाण झाल्यानंतर हेलिकॉप्टर पाच मिनिटांतच कोसळले. प्रचंड धुके असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती घटनास्थळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्यामुळे आतमध्ये असणाऱ्या मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love