पुणे–आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसागर या जोडीला पुणे पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही जण स्पर्धा परीक्षेची तयार करत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्यासह चार महिला आमदारांना फसविण्याचा प्रयत्न मुकेश राठोड आणि त्याची साथीदार सुनिता क्षीरसागर यांनी केला होता. मुकेश राठोड हा मुळचा बुलढाणा येथील राहणारा आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिबवेवाडी पोलीस त्याचा शोध घेत होते. काल त्यांना तो औरंगाबाद येथे सापडला.
यााबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ, आमदार मेघना बोर्डीकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांना आई आजारी आहे आणि पैशांची खूप गरज आहे, असे सांगितले. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी ३ हजार ४००, देवयानी फरांदे – ४ हजार, श्वेता महाले – ३ हजार ७०० रुपये त्यांना दिले. तर आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांनी पैसे दिले नाहीत. त्यानंतर एवढ्यावरच हे दोघे थांबले नाहीत, त्यांनी इतर आमदारांना देखील फोन करून पैशांची मागणी केली.
मुंबईतील बैठकीच्या वेळी चारही आमदार एकत्रित गप्पा मारत असताना. गुगल पे वरून एकाला पैसे दिल्याचे चर्चेमधून समोर आले. त्यानंतर फसवणुक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार माधुरी मिसाळ यांची मुलगी पूजा यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली त्यावेळी ते दोघे औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यावर, दोघांना तेथून सापळा रचून अटक करण्यात आली. त्या दोघांकडे चौकशी केल्यावर, तीन आमदारांकडून घेतलेले पैसे परत दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.