पुणे—पुण्यातील वानवडी भागात घडलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी भाजपने महविकास आघाडी सरकारला आणि शिवसेनेला ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स, फोटोज आणि व्हिडिओ कुठून आणि कसे व्हायरल झाले हा चर्चेचा विषय झाला आहे.
भाजपचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजा चव्हाणच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. बेकायदेशीर रित्या पूजाच्या मृत्यूनंतर तो तिच्या घरात घुसला आणि त्याने तिचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरल्याचे कृत्य केलं, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी केला होता. तर, त्यावर घोगरे यांनी पत्रकार परिषद घेत, पूजा इमारतीवरून खाली पडली तेव्हा तीला मी फक्त उचलून रिक्षात ठेवलं, तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपशी माझा काही संबंध नाही असे स्पष्ट केले होते. मी कुठेही गायब झालेलो नाही. माझ्यावर खोटा आरोप करणाऱ्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. माझ्याकडे लॅपटॉप असण्याचा संबंध नाही. माणुसकीच्या दृष्टीने मी मदत केली आहे. मदत करणे हा गुन्हा आहे का?’, अशी प्रतिक्रियाही धनराज घोगरे यांनी दिली होती.
मात्र, आता या प्रकरणाने आता पुन्हा वेगळे वळण घेतले असून आता पुन्हा या प्रकरणावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पूजा हिचा लॅपटॉप हा नगरसेवक धनराज घोगरे यांनीच घेतला असल्याचा संशय पोलिसांना आला असून पोलिसांनी यांना घोगरे यांना पूजाचा लॅपटॉप आणून द्यावा अशी नोटिस धाडली आहे.