पुणे—पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी -चिंचवड शहरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत तर पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुखही शिंदे गटात सामील झाले आहेत. खासदार बारणे यांचे समर्थक आणि आढळराव यांचे समर्थकही शिंदे गटात जातात की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात खासदार बारणे यांची स्वतःची ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेत. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, शिंदे गटात गेल्याने खासदार बारणे यांच्या थेरगावातील निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील शिंदे गटात गेले आहेत. आढळराव यांनी भोसरीचे १५ वर्षे संसदेत प्रतिनिधीत्व केले. भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिरुरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे या आढळराव यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे आल्हाट, उबाळे हे काय भूमिका घेतात. आढळराव यांच्यासोबत शिंदे गटात दाखल होतात की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतात हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. यानंतर आता पुण्यात देखील उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुखही शिंदे गटात
पुणे जिल्ह्यातील रमेश कोंडे आणि शरद सोनवणे हे दोन जिल्हा प्रमुखही शिंदे गटात सामील झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोघांचीही शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. सेनेचा मुख्यमंत्री असून देखील आमची कामं होत नव्हती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं, पीएमआरडीए आणि पुणे महानगर पालिकेशी बोलतो. नाला, रस्ता अशा सार्वजानिक ठिकाणांची बांधकामं वगळता कोणत्याही बांधकामांना धक्का लागणार नाही. अशाप्रकारची ग्वाही त्यांनी काल पहिल्याच भेटीत दिली आहे. गोरगरीबांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडता येतात. मांडलेले प्रश्न सोडवण्याची त्यांची भूमिका आहे. यावर तात्काळ कारवाई होईल आणि बऱ्यापैकी हा प्रश्न मार्गी लागेल. आपण सांगितलेलं काम ते करतील, अशी अपेक्षा मला आहे. माझ्यापेक्षा येथील मतदारांना आणि महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असं कोंडे म्हणाले.