राज्यात पावसाचा जोर : सातारा घाट क्षेत्रासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

३ ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार
३ ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार

पुणे(प्रतिनिधी)– बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेली हवेची द्रोणीय स्थिती, अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे, दक्षिण गुजरात ते केरळदरम्यान पसरलेला ट्रफ यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवस पुणे- साताऱयातील घाट क्षेत्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हय़ात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी दिला.

अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त हवा जमिनीकडे वाहत आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे मान्सून सक्रिय असून, सोमवारी कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात धो-धो पाऊस बरसला. पावसाचा हा मारा पुढील काही दिवस कायम राहणार आहे. मंगळवारी-बुधवारी पुणे सातारा घाट क्षेत्र, तसेच कोल्हापुरातही शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अधिक वाचा  शिवाजी विद्यापीठ पेपर फुटी प्रकरण : अभाविपचे लोटांगण घालत आंदोलन

राज्यात सध्या पावसाचे पुनरामन झाले असून, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह सर्वदूर पाऊस होताना दिसत आहे. मात्र, पावसाचा सर्वाधिक जोर हा मुंबई व कोकण पट्टय़ात दिसत आहे. पावसाने रौद्र रूप धारण केल्याने कोकणासह राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचे पहायला मिळत आहे. पुढच्या काही दिवसांत पावसाचा हा ओघ कायम राहण्याची चिन्हे आहेत.

 ७१ टक्के पेरण्या पूर्ण  

राज्याच्या काही भागात अद्यापही पावसाचे प्रमाण कमी अधिक असले, तरीदेखील यंदाच्या खरीपाच्या हंगामात ७१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर पुणे विभागात पेरणीचे प्रमाण 86 टक्के इतके असल्याचे कृषी आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र, काही भाग वगळता अद्याप म्हणावा तसा जोर नाही. विशेषतः राज्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणीसाठा समाधानकारक झाला नाही.

अधिक वाचा  वारकरी संप्रदायातील आदरणीय कीर्तनकार विष्णुबुवा जोग महाराज

राज्यात खरीपाचे एकूण क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून आजवर १०१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. मात्र, काही जिल्हय़ांत भाताच्या लावण्या खोळंबल्या असल्याचे सांगण्यात आले. यावषी मान्सून पूर्व पावसामुळे पेरणीपूर्वीची कामे झाली, पण काही जिल्हय़ांत पुरेसा पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीवर मर्यादा येण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे असले, तरी सोयाबीन आणि कापूस या पिकांची पेरणी समाधानकारक झाली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love