पुणे–म्हाडा भरती परीक्षा दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक केली होती. म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ झाली आहे.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करत एजंट कांचन श्रीमंत साळवे (३१ रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आतापर्य़ंत ११ आरोपींना अटक केली आहे. आरोपी साळवे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जी.ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रितिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत पेपर फोडण्याचा कट असल्याचे तपासात समोर आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर ओएमआर शीटमध्ये देशमुख फेरफार करुन परीक्षार्थींना पास करणार होता. परंतु पोलिसांनी त्याचा कट हाणून पाडला. पोलिसानी त्यांचे ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल जप्त केले आहेत.