पुणे– पुण्यात जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट खरेदी बिलांच्या आधारे तब्बल ४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा टॅक्स बिडविणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली आहे. प्रवीण भबूतमल गुंदेचा असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जिरावाला मेटल्स या व्यापाऱ्याने जवळपास ४१ कोटी रुपयांचा बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाखांचा महसूल बुडवला. याबाबत प्रवीण गुंदेचा याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे यांना आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले.
सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून जीएसटी विभाग कर चुकविणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्य़ंत १० कारवाया करण्यात आल्या आहेत. सहायक आयुक्त सतीश पाटील, सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग व अन्वेषण विभागातील राज्य कर निरीक्षक यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता.
जीएसटी विभागाकडे बोगस व्यापाऱ्यांची माहिती असून भविष्यात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर राज्यकर आयुक्त पुणे क्षेत्र धनंजय आखाडे यांनी दिली.