पुणे(प्रतिनिधि)—सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारामध्ये पवार कुटुंबियांकडून एकमेकांची उणीदुणी काढली गेली. अजित पवार विरुद्ध इतर पवार कुटुंबीय असे चित्र प्रचारादरम्यान पहायला मिळाले. मतदानाला येताना अजित पवार त्यांच्या आई आशाताई पवार यांना बरोबर आणत पवार कुटुंबियांमध्ये आशाताई या जेष्ठ असल्याचे आणि माझ्याबरोबर असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे पवार कुटुंबियांमधला वाद किती टोकाला गेला असल्याचे दिसत असतानाच बारामती मध्ये अचानक एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
त्याचे असे झाले बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा अचानकपणे काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी वळवला. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या आशाताई पवार या होत्या. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या घरातून बाहेर पडताना सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आशाकाकींना (अजित पवार यांच्या आई) भेटायला आल्याचं सांगितलं. “मी आशाकाकींना भेटायला आले होते. एका सशक्त लोकशाहीत मतदान हे जबाबदारीचं काम असतं. आशाकाकी अतिशय जबाबदारीने मतदानाला आल्या. मी फिरत फिरत इथे भेटायला आले. हे आमचं नेहमीचंच रुटीन आहे. थोड्या वेळापूर्वी सुमती काकीही मला भेटल्या. प्रतापकाका, आशाकाकी अशा आमच्या घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मी कायमच घेते. काकी आणि मीच होते. हे माझ्या काका – काकींचे घर आहे. आशीर्वाद घेतला आणि लगेच निघाले. माझी प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी दोन महिने दरवर्षी याच घरात जायची. मी सुट्टीत दोन महिने इथे राहायचे. त्या वेळी फोन नव्हते. मी एकदा इकडे आले की, माझे माझ्या आईशी दोन महिने बोलणे पण होत नसे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं माझ्या सगळ्या काकींनी केलं आहे, असेही त्या म्हणाल्या.
हे आमच्या सर्व भावंडांचे घर आहे
अजित पवारांच्या घरी गेल्याने राजकरणात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. अजित पवारांच्या घरी असा उल्लेख केला असता सुप्रिया सुळेंनी हे अजित पवारांचे नाही तर माझ्या काका- काकींचे घर आहे, असे अधोरेखीत केले. तसेच हे आमच्या सर्व भावंडांचे घर आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवारांची भेट झाली?
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी भेट दिली तेव्हा अजित पवारही घरात उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. अजित पवारांचीही भेट घेतली का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता आपली इतर कुणाशीही भेट झाली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. हे आपल्या काकींचं घर असून तिथे आपण कधीही येऊ शकतो असं सांगतानाच काकींना भेटून मी लगेच निघाले, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. “जेवढं माझ्या आईनं माझं केलं नसेल, तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकींनी केलं आहे”, असंही त्या म्हणाल्या.