पुणे—महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर शंभरहून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले.
ठाकरे यांच्या घराबाहेर शंभरहून अधिक पुरोहितांनी विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसुप्त पाठ हे सामूहिक मंत्र पठण केले. पुरोहितांनी राज ठाकरे यांना आशीर्वाद देखील दिला. राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील सभेला विजय आणि यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद देणार आहोत. दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि त्यांची जी हिंदूजननायकाची भूमिका आहे. त्या करिता मंत्रांचा, दैवतांचा आशीर्वाद आणि पाठींबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तसेच, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद दिला जाणार आहे.”, असे यावेळी पुरोहितांनी सांगितले.
राज ठाकरे हे पुण्याहून निघल्यानंतर त्यांनी तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. गुडीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत अल्टिमेटम दिला आहे. उद्या (१ मे) औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक हजर राहणार आहेत. उद्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
३ मे रोजी मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन
दरम्यान ३ मे रोजी रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू झाली असून आज(शनिवार) शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.