पुणे(प्रतिनिधि)— पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल 3 द लिझर लाउंज’ या पबमधील स्वच्छता गृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एका मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ दोन-तीन महिन्यापूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे.
या व्हिडिओत दोन तरुणी पबमधील वॉशरुममध्ये जाऊन सेवन करत असल्याचे दिसतेआहे. या घटनेनंतर तिथला स्टाफ या तरुणींना पकडतो असं यात दिसतं आहे. पण व्हिडिओ दोन ते तीन महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याची कुठलीही गंभीर नोंद घेतली नसल्याचं समोर आलं आहे.
कालच पुण्यातील प्रमुख एफसी रोडवरील ‘एल 3 द लिझर लाउंज’ या पबमध्ये ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळं पुणे शहरात ड्रग्जचं रॅकेट कार्यरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्याकाही दिवसानं सातत्यानं ड्रग्जचा साठा आणि सेवन करणाऱ्या तरुणांच्या अनेक घटना समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.