पुणे(प्रतिनिधी) -नामदार गोपाळकृष्ण गोखले पदावर (फर्ग्युसन महाविद्यालय) असलेल्या लिक्विड लेझर लाउंज (एलएलएल) मध्ये पार्टीसाठी आलेल्यांना अमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अटक आरोपीपैकी तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांची देखील चौकशी होणार असून त्यानुसार या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. दरम्यान, एलएलएलच्या शौचालयात काही तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बारचे मालक, बार चालविणारे आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून त्यांना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, बारचा परवाना तिसरा मजल्यासाठी असून त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सव्वा तीन लाखांचा मद्याचा साठा करून ठेवला होता आणि पहिल्या आणि चौथ्या मजल्यावर मद्यविक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. सुरवातीला टोळक्याने हडपसर मध्ये पार्टी केलेल्या कलर्ट हॉटेल मध्येच फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेल मध्ये मध्यरात्री पार्टी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते ही बाब पण समोर आली आहे.
‘एलएलएल’मध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा मिळून आला आहे. आरोपीकडे या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा अवैध मद्याचा साठा असण्याची शक्यता आहे. कारवाई केल्यानंतर तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. या ठिकाणी अल्पवयीन मुलांना देखील अमली पदार्थ देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कराराचे पालन होत आहे की नाही हे पाहणे बारच्या जागा मालकाची जबाबदारी होती. त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
पार्टीला आलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश
कारवाईच्या दिवशी झालेल्या पार्टीचे आयोजन अक्षय कामठे याने केले होते. सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांना अमली पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी बारमध्ये बोलाविले असल्याचे प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसून आले आहे. कामठे याने आयोजित केलेल्या पार्टीची एन्ट्री फी ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे. बार बंद करण्याची वेळ झाल्याने पार्टीला आलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आला होता. गायकवाड तिथे थांबलेला होता, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयास दिली.
आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
पार्टीला आलेल्या ग्राहकांबाबतची माहिती आरोपींकडून घ्यायची आहे. तसेच पार्टीत अमली पदार्थ कोणी व कुठून आणले, याबाबत अधिक माहिती व पुरावे हस्तगत करायचे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मुलांचा आरोपींच्या मदतीने शोध घ्यायचा आहे. पार्टीला आलेल्यांमध्ये कोणाचा अमली पदार्थ पुरवठ्यामध्ये सक्रिय सहभाग आहे, याचा तपास करायचा आहे. पार्टीच्या आयोजनात कोणाचा वरदहस्त आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य मोठ्या स्वरूपाचे असून अटक आरोपींकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. आरोपींच्यावतीने जी. एन. अहिवळे, राजेश कातोरे, विक्रम नेवसे, मनीष पडेकर आणि तौसिफ शेख यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी आरोपींना शनिवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली.
सहा वेटरही पोलिस कोठडीत
दरम्यान, पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल-३’ बारमध्ये छापा टाकून सव्वा तीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला; तसेच सहा वेटरना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. या सहा आरोपींनाही न्यायालयाने २९ जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मोहित राजेश शर्मा (वय २९, मूळ रा. सेमरा रोवा, मध्य प्रदेश), अमीर असफ अली हुसैन (वय २७, मूळ रा. नागाव, आसाम), सौरव शेखर बिसवास (वय २५, मूळ रा. २४ परगणा, पश्चिम बंगाल), खैरूल इस्लाम समसुलहक (वय २२, मूळ रा. होजाई, आसाम), कोहिमुद्दीन इलाम शेख (वय ३०, मूळ रा. नाडिया, पश्चिम बंगाल) आणि नरूल इस्लाम ताहिरुद्दीन (वय २२, मूळ रा. नागाव, आसाम, सर्व सध्या रा. शिवाजीनगर) अशी कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. ‘एल-३’ बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीतील ग्राहकांना या आरोपींनी बेकायदा मद्य ‘सर्व्ह’ केले होते. त्यांची चौकशी करून अन्य आरोपींनाही अटक करायची आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.