पुणे–देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे पावसामुळे अडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार सोमवारी (दि. १७) सायंकाळी होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली सापडून पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. मरण पावलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
मृतांची नावे –
अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड)
शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड)
वर्षा केदारे (वय 40, शितळानगर, देहूरोड)
भारती मंचळ (वय 30, शितळानगर, देहूरोड)
राम प्रल्हाद आत्मज (वय 20, उत्तर प्रदेश)
जखमींची नावे –
विशाल शिवशंकर यादव (वय 20, उत्तर प्रदेश)
रहमद मोहमद अंसारी (वय 21, बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे)
रिंकी दिलीप रॉय (वय 45, देहूरोड)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. पण अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात १५ जण अडकले होते. तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीमने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी सांगितले की, साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कटरच्या साह्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महापालिका अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक या ठिकाणी तैनात असून त्यांच्याकडून युद्ध पातळीवर रात्री उशिरापर्यंत होर्डिंग हटवण्याचे काम सुरू होते.